गडचिरोली : तेलंगणातील श्रीरामसागर जलाशयातून सध्या १० लाख क्युसेक पाणी गोदावरीत सोडले जात आहे. तब्बल १३ लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होणार असून हे पाणी पुढील काही तासांत जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यात येणार आहे. परिणामी नदीकाठच्या गावांना पूरस्थितीचा गंभीर धोका निर्माण झाला आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी २९ सप्टेंबर रोजी तातडीने आढावा बैठक घेतली. महसूल, पोलिस, आरोग्य, वन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले. बैठकीला अपर जिल्हाधिकारी नितीन गावंडे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सूर्यवंशी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नीलेश तेलतुंबडे उपस्थित होते. तर तालुकास्तरीय अधिकारी दूरदृष्य प्रणालीद्वारे सहभागी झाले.
नागरिकांचे स्थलांतर सुरु
नदीकाठच्या गावांना दवंडी देऊन सतर्क करण्यात येत आहे. धोक्यातील कुटुंबांना शेल्टर होममध्ये हलवण्याचे आदेश तहसीलदारांना देण्यात आले आहेत. महसूल, पोलिस आणि वनविभागाच्या संयुक्त पथकांकडून हालचाली सुरू आहेत.
एसडीआरएफ पथके तैनात
पूरस्थितीला तोंड देण्यासाठी एसडीआरएफ पथके सज्ज आहेत. स्थानिक यंत्रणाही अलर्ट झाली आहे. भामरागड मुख्यालयातील पथकही तातडीने सिरोंचात हलवले जात आहे. पाण्याचा विसर्ग रात्रीच्या वेळी होणार असल्याने नागरिकांमध्ये गोंधळ निर्माण होऊ नये, यासाठी पोलिस प्रशासनाला अफवांवर नियंत्रण ठेवण्याची सक्त ताकीद देण्यात आली आहे.
आरोग्य विभाग हायअलर्टवर
पूरानंतर संसर्गजन्य आजारांचा धोका असल्याने आरोग्य विभागाला ब्लिचिंग पावडर, औषधसाठा उपलब्ध ठेवण्याचे आदेश दिले आहेत. शेल्टरहोममध्ये आरोग्य सुविधा तत्पर ठेवण्यास सांगण्यात आले आहे. जिल्हाधिकारी पंडा यांनी सर्व विभागांना समन्वयाने काम करून नागरिकांचे प्राण व मालमत्ता सुरक्षित ठेवण्यावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले आहे.
Web Summary : Gadchiroli faces flood threat as Telangana releases water from Sriram Sagar. Evacuations underway, SDRF deployed. Health officials are on high alert for potential outbreaks.
Web Summary : तेलंगाना द्वारा श्रीराम सागर से पानी छोड़े जाने से गढ़चिरौली में बाढ़ का खतरा मंडरा रहा है। निकासी जारी, एसडीआरएफ तैनात। स्वास्थ्य अधिकारी सतर्क।