गडचिरोली : जिल्ह्यातील शेकडो गावांमध्ये सौरऊर्जेवर आधारित दुहेरी पंप लघू नळ योजना २००८ पासून राबविण्यात येत आहे. मात्र यातील बहुतांश योजनांच्या सौरप्लेटची चोरी झाली आहे. तर काही काही योजनांमध्ये बिघाड निर्माण झाला आहे. मात्र सदर योजनांची दुरूस्ती करण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत झाले असल्याने या योजना केवळ शोभेच्या वस्तू ठरल्या आहेत. सिरोंचा तालुक्यात २३, अहेरी तालुक्यात ३४, धानोरा ३०, कुरखेडा तालुक्यात ३५, भामरागड तालुक्यात २४, कोरची तालुक्यात २२, गडचिरोली तालुक्यात ११, आरमोरी तालुक्यात ३८, चामोर्शी तालुक्यात ४० व मुलचेरा तालुक्यात ११ योजनांचे बांधकाम करण्यात आले. गावातील हातपंपावर पाणीपंप बसवून हातपंपातील पाणी काढून जवळच्या लहान पाण्याच्या टाकीमध्ये जमा केले जाते. या टाकीचे पाणी १० ते १५ घरांना नळाद्वारे पुरविले जाते. गडचिरोली जिल्ह्यातील बहुतांश गावांमध्ये विजेची समस्या आहे. अशा गावांमध्ये सौरउर्जेवर चालणारे पाणीपंप देण्यात आले होते. मात्र २००८ पासून या योजनेच्या देखभालीकडे प्रशासन व गावकऱ्यांचे दुर्लक्ष झाले आहे. काही दिवस या योजना चांगल्या पद्धतीने काम करीत होत्या. त्यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष व महिलांचा त्रास कमी झाला होता. कित्येक पाणी पुरवठा योजनांच्या सौरप्लेट चोरीला गेल्या आहेत. सदर योजना अत्यंत चांगली असली तरी ग्रामपंचायतीचेही याकडे दुर्लक्ष झाले आहे. या योजनेसाठी शासनाचे लाखो रूपये खर्च झालेत. तत्कालीन ग्रामविकास मंत्री जयराम रमेश यांनी या योजनेची पाहणी केल्यानंतर ही संकल्पना त्यांना अत्यंत आवडली. ही योजना आंध्रप्रदेशामध्ये गडचिरोली मॉडेल म्हणून सुरू केली. आंध्र प्रदेशामध्ये अशा प्रकारच्या हजारो गावातील योजना यशस्वीपणे सुरू आहेत. या योजनेचा जनक असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात मात्र ही योजना प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षतेमुळे निरूपयोगी ठरली आहे. ही बाब गांभीर्याने घेण्याची गरज निर्माण झाली आहे. (नगर प्रतिनिधी)
सौर ऊर्जेवरील नळयोजना बंद
By admin | Updated: August 31, 2014 23:49 IST