गडचिरोली : मागील २० ते २५ दिवसांपासून पाऊस बेपत्ता झाल्याने गडचिरोली उपविभागात चामोर्शी तालुक्यातील फराडा, मार्कंडा, भेंडाळा, तळोधी, तांबासी आदी निवडक गावांमध्ये सोयाबीन व धानपिकावर अनेक रोगांनी हल्ला केल्याने पीक धोक्यात आले असल्याचे वास्तव पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथील कृषी तज्ज्ञांनी दिलेल्या भेटीत उघडकीस आले आहे. नागपूरचे कीटकशास्त्र विषय विशेष तज्ज्ञ डॉ. तांबे, अकोला येथील डॉ. कोल्हे, डॉ. जुवूघाले, गडचिरोलीचे डॉ. नेरकर आदी कृषी तज्ज्ञांच्या चमुने फराडा, मार्र्कंडा, भेंडाळा, तळोधी, तांबासी आदी निवडक गावातील शेतींना भेटी दिल्या. या भेटीदरम्यान शेतीतील पिकांचे निरीक्षण केले असता, सोयाबीन पिकावर चक्रीभृगा, तंबाखूची पाने खानारी अळी, उंट अळी, पाने गुंडाळणारी अळी आदी अळ्यांचा तर पिवळा मोझॉक व कोरडी मर आदी रोग आढळून आले. धानपिकावर अल्पप्रमाणात पाने गुंडाळणारी अळी (बेरड), निळे, हिरवे भृगेरे, खोडकीड, सिंगे अळी यासह किडी व करपा, कडाकरपा आदी रोग पिकावर आढळून आले. या पिकावरील अळी व रोगांच्या आक्रमणामुळे सोयाबीन व धानपिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याचे कृषी तज्ज्ञ चमुतील तज्ज्ञांच्या लक्षात आले. कृषितज्ज्ञांनी पाच गावांमधील धान, सोयाबीन, तूर आदी पिकांची पाहणी केली व पिकावर करावयाच्या उपाययोजनांबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कृषितज्ज्ञ चमुच्या भेटीचे आयोजन क्रॉपशाप २०१४-१५ अंतर्गत गडचिरोली उपविभागीय कार्यालयातील प्रकल्प कीड नियंत्रक एम. जे. देहारे यांनी केले होते. या भेटीदरम्यान कृषी तज्ज्ञांनी धान, सोयाबीन, तूर पिकाचे सर्व्हेक्षण केले.(शहर प्रतिनिधी)
सोयाबीन व धानावर रोगांचा हल्ला
By admin | Updated: August 27, 2014 23:29 IST