एटापल्ली : अतिदुर्गम भागात असलेल्या एटापल्ली तालुक्यातील आदिवासी गावांत सौरदिवे लावण्यात आले; परंतु अनेक गावांत लावण्यात आलेले सौरदिवे नादुरुस्त अवस्थेत आहेत. सौरदिव्यांच्या बॅटऱ्या चोरीला गेल्याने सौरदिवे निकामी झाले आहेत.
पशुखाद्य महागले
आलापल्ली : दुभत्या व कष्टाचे काम करणाऱ्या जनावरांना सरकी, ढेप, कडधान्यांचा कोंडा चारला जातो. यामुळे जनावर सुदृढ राहून दूध जास्त देते. वाढत्या महागाईचा फटका पशुखाद्यांनाही बसला आहे. किमती १० टक्क्यांनी वाढल्या.
मातीच्या बांधाचे प्रस्ताव मंजूर करण्याची मागणी
आलापल्ली : वनविभागातर्फे दोन वर्षांपूर्वी जंगलातील सहा स्थानांवर मातीचे बांध बांधण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आला होता; परंतु प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सदर प्रस्ताव अजूनही धूळ खात पडला आहे.
कचरा व्यवस्थापन करा
आरमोरी : शहरासह तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात कचरा व्यवस्थापनाचे काम रखडलेले आहे. त्यामुळे अनेक गावांबाहेर कचऱ्याचे ढीग नेऊन टाकले जातात व या कचऱ्यावर दिवसभर जनावरे पसरून राहतात. त्यामुळे येथे कचरा व्यवस्थापन प्रकल्प निर्माण करावा, अशी मागणी होत आहे.
दवाखान्याची दुरवस्था
भामरागड : तालुक्यातील लाहेरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार पुरेशा इमारतीअभावी एकाच खोलीतून सुरू आहे. या आरोग्य केंद्रात परिसरातील अनेक रुग्ण औषधोपचारासाठी रोज येतात. सदर आरोग्य केंद्राच्या नव्या इमारतीचे काम तत्काळ सुरू करावे, अशी मागणी हाेत आहे.
नाली, रस्ते बांधा
अहेरी : परिसरातील दुर्गम भागांत वसलेल्या कोडसेपल्ली येथे अनेक समस्यांची भरमार आहे. गावात नाल्यांचा अभाव असल्याने पाण्याचा निचरा होण्यास अडचण होत आहे. परिणामी जागोजागी सांडपाणी साचून दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे नाली व रस्त्यांचे बांधकाम करण्याची मागणी हाेत आहे.
रायगट्टा पुलावर कठडे करा
अहेरी : तालुक्यातील रायगट्टा पुलावर कठडे उभारण्यात आलेले नाहीत. सदर पूल कमी उंचीचा व अरुंद आहे. कठडे नसल्याने वाहन पुलाखाली कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वाहनचालकांना जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागतो. कठडे नसल्याने जनावरेसुद्धा जखमी झाली आहेत.
सिंचन सुविधेचा अभाव
सिरोंचा : तालुक्यातील झिंगानूर परिसरात धानपिकाचे उत्पादन घेतले जाते. मात्र या परिसरात सिंचनाची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे धानपीक करपते. या क्षेत्रात सिंचन सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी या परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे; परंतु या मागणीकडे दुर्लक्ष हाेत आहे.
कृषिपंपांना वीजच नाही
देसाईगंज : शासनाच्या कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना विजेवर चालणारे मोटारपंप देण्यात आले. शेतकऱ्यांनी वीजजोडणीसाठी डिमांडची रक्कम भरली. मात्र दोन वर्षांचा कालावधी उलटूनही वीजजोडणी मिळाली नाही. शेतकरी शासकीय कार्यालयांत हेलपाटे मारीत आहेत.