Six months imprisonment for both | दोघांना सहा महिन्याचा कारावास

दोघांना सहा महिन्याचा कारावास

ठळक मुद्देशिवीगाळ व मारहाण प्रकरण : आरोपींमध्ये महिला डॉक्टरचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने शुक्रवारी दोन आरोपीस प्रत्येकी सहा महिन्यांचा सश्रम कारावास व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
डॉ. नंदा मारोतराव हटवार (३४) रा. पंचवटी नगर गडचिरोली व अमर सत्यविजय दुर्गे (३०) रा. रामनगर गडचिरोली असे शिक्षा झालेल्या आरोपींचे नाव आहे. आरोपी डॉ. नंदा हटवार व अमर दुर्गे या दोघांनी २३ मार्च २०१९ रोजी येथील ओंकार नगरातील रहिवासी डॉ. सौरभ अरूणराव नागुलवार यांच्या घरी जाऊन त्यांच्याशी पैशाच्या देवाणघेवाणच्या कारणावरून भांडण केले. शिवीगाळ करून त्यांना लाथाबुक्यांनी मारहाण केली, अशी तक्रार डॉ. नागुलवार यांनी २३ मार्च रोजी गडचिरोलीच्या पोलीस ठाण्यात दाखल केली. तक्रारीवरून दोन्ही आरोपीविरोधात भादंविचे कलम ४४८, ३२३, ५०४, ५०६, भादंवि ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. गडचिरोली पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरिक्षक दीपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार दादाजी ओल्लालवार यांनी सदर गुन्ह्याचा तपास करून आरोपीविरोधात गडचिरोलीच्या जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयाचे मुख्य न्याय दंडाधिकारी बी. एम. पाटील यांच्या न्यायालयाने आरोपीविरूध्द सबळ साक्ष पुराव्यावरून शिक्षा सुनावली.
आरोपी डॉ. नंदा हटवार व आरोपी अमर दुर्गे यांना भादंविचे कलम ४४८, ३४ अन्वये प्रत्येकी सहा महिने सश्रम कारावास व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता योगीता राऊत यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून यशवंत मलगाम यांनी काम पाहिले.

Web Title: Six months imprisonment for both

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.