अटींची पूर्तता झाल्यास जागा देण्यास तयार : सुरजागडवरून लोहखनिजाची वाहतूक पावसामुळे रखडलीगडचिरोली : बहुप्रतिक्षीत सुरजागड येथील लोहखनिज प्रकल्पाचा मार्ग प्रशासनाच्या सहकार्यामुळे सुकर होण्याची चिन्ह दिसू लागली आहे. एटापल्ली तालुक्यातील सुरजागड पहाडीवर चार महिन्यानंतर मालाची वाहतूक करण्यासाठी रस्ता तयार करण्याचे काम पूर्णत्वास आले आहे. येथून लोहखनिज चंद्रपूर जिल्ह्यात सहा महिने वाहून नेल्यानंतर चामोर्शी तालुक्यातील आष्टी, कोनसरी परिसरात प्रकल्प टाकण्यासाठी जागेचा शोध सुरू करण्यात आला आहे. सहा महिन्याच्या आता स्थानिक शेतकऱ्यांची जागा घेऊन एक ते दीड वर्षात येथे प्रकल्प उभा करण्याची तयारी लायडस् मेटल या उद्योग समुहाने चालविली असल्याची माहिती आहे.लायडस् मेटल या उद्योग समुहाचे विदर्भात वर्धाजवळच्या भूगाव, चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस येथे प्रकल्प असून १० वर्षापूर्वी गडचिरोली जिल्ह्यात लीज घेऊन त्यांना उत्खननाचे काम करता आले नव्हते. मात्र केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार सत्तारूढ झाल्यानंतर केंद्रीय गृह विभागाने या भागात उद्योग उभारण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यानंतर येथे उत्खननाच्या कामाला सुरूवात करण्याची हिंमत कंपनीने केली. मध्यंतरी मे महिन्यात आंदोलनामुळे काही काळ सुरू झालेली लोहखनिजाची वाहतूक ठप्प झाली. त्यानंतर आता सप्टेंबरमध्ये पुन्हा रस्ता तयार करून वाहतूक सुरू होणार तोच पावसाने रस्ता खराब झाल्याने सध्या वाहतूक ठप्प पडून आहे. सध्या केंद्र सरकारकडून येथे पॅरामिल्ट्री फोर्सेसच्या काही तुकड्या पाठविण्यात आल्या आहे. शिवाय लिजच्या अटी शर्तीनुसार येथे मालवाहतुकीसाठी रस्ताही तयार करू देण्यात आला आहे. याचाच अर्थ येथून आता लवकरच मालाची वाहतूक होण्याची शक्यता आहे. आष्टी, कोनसरी परिसरात एमआयडीसी निर्माण व्हावी, यासाठी गेल्या काही वर्षांपासून जिल्हा प्रशासन शेतकऱ्यांशी विविध स्तरावर वाटाघाटी करीत होते. या भागातील शेतकऱ्यांच्या अटींना माणून या भागात जमीन उद्योगासाठी खरेदी करण्याची तयारी कंपनीने केली असून त्या दृष्टीने प्रशासनाला सुध्दा सांगण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी या भागातील काही शेतकऱ्यांनी जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन जमिनीबाबत चर्चा केली असल्याचे वृत्त आहे. मात्र याला अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही. एकूणच परिस्थिती पाहू जाता गडचिरोली जिल्ह्यात लोहखनिज प्रकल्प येत्या तीन वर्षात सुरू होण्याची आशा आहे. (जिल्हा प्रतिनिधी)रेल्वेचे जाळे विस्तारित करण्याचा प्रयत्नगेल्या काही वर्षांपासून चंद्रपूर व गडचिरोली-चिमूर या दोन्ही लोकसभा क्षेत्राच्या खासदारांनी बल्लारशहा-सुरजागड या रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण व्हावे, यासाठी मागणी केली होती. सुरजागड परिसरात उद्योग व लोहखनिज उत्खननाचे काम सुरू झाल्यास या भागात रेल्वेचे जाळे विस्तारण्याची शक्यता असून वडसा-गडचिरोली या रेल्वे मार्गाचाही एटापल्लीपर्यंत विस्तार खासगी उद्योजकांच्या माध्यमातून करून घेण्याचा केंद्र व राज्य सरकारचा प्रयत्न आहे. याबाबत काही महिन्यांपूर्वी केंद्रस्तरावरही बैठक झाली, असे समजते. खासगी रेल्वे मार्ग टाकून त्यावर प्रवाशी व कंपनीची वाहतूक देशात अनेक भागात केली जाते. असाच हा प्रयत्न राहणार आहे.
सहा महिन्यांत आष्टी परिसरात उद्योगासाठी जागा शोधणार
By admin | Updated: September 18, 2016 01:54 IST