Six days police custody of Shifa | शिफाला सहा दिवसांची पोलीस कोठडी
शिफाला सहा दिवसांची पोलीस कोठडी

ठळक मुद्देगूढ उकलणार : कोट्यवधी रुपयांचे फसवणूक प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज : शहरातील बहुचर्चीत कोट्यवधी रुपयांच्या प्रकरणातील आरोपी शिफा ऊर्फ शबाना मोहम्मद शेख व तिचा भाचा मिसार चौधरी याला पोलिसांनी रविवारी रात्री उत्तर प्रदेशाच्या बलरामपूर जिल्ह्यातील गोकुल बुजुर्ग येथून अटक केली. मंगळवारी रात्री आरोपींना देसाईगंजात आणण्यात आले. त्यानंतर या दोघांना बुधवारी देसाईगंजच्या न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने दोन्ही आरोपींना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
कमी किमतीत महागड्या व चांगल्या दर्जाच्या वस्तू देण्याच्या आमिषाखाली शिफाने देसाईगंज शहरासह तालुक्यातील अनेक लोकांना लाखो रुपयांनी गंडविले. मात्र या फसवणूक प्रकरणातील अनेक गुढ कायम आहे. पोलीस कोठडीत पोलिसांकडून सदर फसवणूक प्रकरणाचे रहस्य उलगडविण्यात येणार आहे. देसाईगंज शहराच्या राजेंद्र वॉर्डात शिवण क्लास व ब्युटी पार्लरचा व्यवसाय थाटून या माध्यमातून शिफाने अनेक लोकांची आर्थिक फसवणूक केली. शासकीय स्तरारून अनुदानावर मिळणाऱ्या वस्तू मिळवून देण्याच्या नावाखालीही शिफाने अनेकांना आपल्या जाळ्यात ओढले. १८ जून रोजी पोलीस निरीक्षक प्रदीप लांडे यांच्या मार्गदर्शनात देसाईगंज पोलिसांनी धाड टाकून अनेक महत्त्वपूर्ण दस्तावेज ताब्यात घेतले होते. उपरोक्त दस्तावेजाच्या आधारे पोलीस निरीक्षक प्रदीप लांडे यांनी तपासचक्रे फिरवून शिफाला अटक करण्यासाठी पथक उत्तर प्रदेशाकडे रवाना केले.
दरम्यान शिफा व तिचा भाचा विशाल चौधरी हे रविवारी पोलिसांच्या हाती लागले. त्यांना मंगळवारी देसाईगंज येथे आणण्यात आले. सदर प्रकरणातील दोन आरोपींना अटक झाल्यामुळे या प्रकरणात आणखी किती जणांचा सहभाग आहे, हे तपासातून समोर येणार आहे.
शिफाचा पती फरारच
कोट्यवधी रुपयांच्या फसवणूक प्रकरणातील आरोपी शिफा ऊर्फ शबाना व तिचा पती राज मोहम्मद चौधरी यांना अटक करण्यात आल्याची माहिती मंगळवारी देण्यात आली. मात्र शिफासोबत अटक करण्यात आलेला आरोपी तिचा पती नसून भाचा विशाल चौधरी असल्याचे बुधवारी स्पष्ट करण्याता आले. शिफाचा पती राज मोहम्मद शेख ऊर्फ चौधरी हा फरार होण्यात यशस्वी झाला असून देसाईगंज पोलीस त्याचा कसून शोध घेत आहे.


Web Title: Six days police custody of Shifa
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.