लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : स्थानिक पंचायत समितीअंतर्गत गट्टा ग्रामपंचायतीच्या हद्दीतील जाजावंडी येथील अर्धवट विहिरीत पडून एका बालकाचा मृत्यू झाल्याची घटना १६ सप्टेंबर रोजी घडली. या अर्धवट असलेल्या बांधकामामुळे त्या बालकाचा हकनाक बळी गेला. त्यानंतरही ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने या विहिरीचे बांधकाम पूर्ण करण्याकडे लक्ष दिले जात नसल्यामुळे नागरिकांमध्ये प्रशासनाप्रती रोष व्यक्त केला जात आहे.जिल्हा परिषदअंतर्गत ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग अहेरीच्या वतीने राष्ट्रीय पेयजल योजनेतून सन २०१३ मध्ये गट्टा ग्रामपंचायतीअंतर्गत जाजावंडी, जाजावंडीटोला, मोहंदी, बेसेवाडा, खुर्जेमरका, गुंडजूर, कसरीटोला आदी गावांमध्ये आठ ते दहा विहिरींचे बांधकाम मंजूर करण्यात आले. तत्कालीन ग्रामसेवक डी.एच.वंजारी यांनी या विहिरींचे बांधकाम पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. या कामापोटी ग्रामपंचायत प्रशासनाला पहिल्या हप्त्याचा ११ लाख रुपयांचा निधी मिळाला होता. दरम्यान ग्रामसेवक वंजारी यांच्यावर विहिर बांधकामात गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवण्यात आला. त्यामुळे विहिरींचे बांधकाम अर्धवटस्थितीत राहिले.तब्बल सात वर्ष उलटूनही आठ ते दहा विहिरींपैकी एकाही विहिरीचे काम पूर्ण झाले नाही. दरम्यान गेल्या १६ सप्टेंबर रोजी त्या अर्धवट विहिरीजवळ बकऱ्या गेल्या. त्या बकऱ्यांना दुसरीकडे हाकलण्यासाठी जाजावंडी टोला येथील अंथोनिश जोसेफ मिंच हा १२ वर्षीय मुलगा विहिरीजवळ गेला. पण विहिरीच्या बाजूचा भाग खचून तो मुलगा डोक्याच्या भारावर पडून दबल्या गेला. लगेच गावकºयांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. तब्बल सहा तासांनी ग्रामस्थांनी त्याचा मृतदेह बाहेर काढला. चार ते पाच आॅईल इंजिन लावून या विहिरीतील पाण्याचा उपसा करण्यात आला.लोकमत प्रतिनिधीने २८ सप्टेंबर रोजी या गावाला भेट दिली. अर्धवट विहिरीचे बांधकाम तत्काळ पूर्ण करण्यात यावे किंवा विहीर बुजवावी तसेच मृतक बालकाच्या कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी. तसेच तत्कालीन ग्रामसेवक डी.एच.वंजारी यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली जात आहे.तक्रारी करूनही ग्रामसेवकावर कारवाई नाहीसन २००७ ते २०१७ या १० वर्षांच्या कालावधीत गट्टा ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवक म्हणून डी.एच.वंजारी कार्यरत होते. दरम्यान गावातील पाणीपुरवठा योजना व इतर कामात भ्रष्ट्राचार केल्याबाबतच्या वंजारी यांच्या विरूद्ध अनेक तक्रारी नागरिकांनी प्रशासनाकडे केल्या होत्या.स्थानिक लोकप्रतिनिधींनीही ग्रामसेवकाविरोधात प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या. मात्र तीन वर्ष उलटूनही संबंधित ग्रामसेवकावर कुठलीही कारवाई झाली नाही. प्रशासन या ग्रामसेवकाची पाठराखण तर करीत आहे काय, असा सवाल या क्षेत्राचे जि.प.सदस्य सैनू गोटा यांनी केला आहे.भविष्यात आणखी अपघात होण्याआधी या विहिरीचे काम पूर्ण करावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
बालकाचा बळी घेणारी ‘ती’ विहीर अजूनही अर्धवट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2020 05:00 IST
तत्कालीन ग्रामसेवक डी.एच.वंजारी यांनी या विहिरींचे बांधकाम पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. या कामापोटी ग्रामपंचायत प्रशासनाला पहिल्या हप्त्याचा ११ लाख रुपयांचा निधी मिळाला होता. दरम्यान ग्रामसेवक वंजारी यांच्यावर विहिर बांधकामात गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवण्यात आला. त्यामुळे विहिरींचे बांधकाम अर्धवटस्थितीत राहिले.
बालकाचा बळी घेणारी ‘ती’ विहीर अजूनही अर्धवट
ठळक मुद्देसात वर्ष उलटले तरी बांधकाम पूर्ण नाही : जाजावंडी टोला येथील विहिरीचे काम रखडले