गडचिरोली : झाडीपट्टीची रंगभूमी म्हणून गोंदिया जिल्हा ओळखला जातो. या झाडीपट्टीने अनेक मोठे कलावंत घडवले असून, त्यांनी आपल्या अभिनयातून श्रोत्यांच्या मनावर प्रतिबिंब उमटवले आहे. असाच एक छंद वेडा कलावंत अर्जुनी मोरगाव तालुक्यातील सावराटोला येथील आहे. गेल्या ४० वर्षापासून ते नाच्याचे पात्र साकारून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहेत.
शालीकराम खुशाल बिहारे (६४, रा. सावरटोला) असे त्या कलावंताचे नाव आहे. ते वयाच्या १८ व्या वर्षापासून नाचण्याचा छंद जोपासत आहेत. शेती व शेतमजुरी करणारे शालिकराम हे दिवाळीपासून महाशिवरात्रीपर्यंत गावागावात होणाऱ्या मंडईत साडी-चोळी घालून नाच्याचे पात्र साकारतात. एखाद्या देखण्या बाईला लाजवेल, असे नेपथ्य करून श्रोत्यांना भुरळ घालतात. गावागावांमध्ये होणाऱ्या मंडई, दंडार यात एकपात्री प्रयोग सादर करतात. तसेच खडीगंमत तमाशा सादर करून नृत्य सादर करतात. केवळ अर्ध्या तासात स्वतःचे नेपथ्य करून तयार होतात. मंडई उत्सवामध्ये दिवसाला पाचशे ते हजार रुपयांची मजुरी त्यांना मिळते. पण आपण या मजुरीसाठी किंवा पैशांसाठी मी नाचत नसून छंद म्हणून ही कला सादर करत असल्याचे शालीकराम सांगतात.