न्यायालयाचा निकाल : अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार गडचिरोली : उपचार करण्याच्या बहाणाण्याने अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या डोंगी पुजाऱ्यास गडचिरोलीच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने सात वर्षांचा सश्रम कारावास व पाच हजार रूपये दंडाची शिक्षा गुरूवारी ठोठावली. बाबुराव गोविंदा कुमोटी रा. सोनसरी असे शिक्षा झालेल्या आरोपी भोंदू पुजाऱ्याचे नाव आहे. पीडित मुलगी एक वर्षापासून डोके व अंगदुखीने त्रस्त होती. वडिलांची आर्थिक स्थिती हलाखीची असल्याने तिला दवाखान्याने नेणे बंद केले होते. गेवर्धा येथे राहणाऱ्या पीडित मुलीच्या मोठ्या आईने बाबुराव कुमोटी हा आजार दुरूस्त करतो, असे सांगितले. त्यानुसार २० जानेवारी २०१५ रोजी बाबुराव कुमोटी यांच्याकडे पीडित मुलगी व तिची आई उपचारासाठी गेली. पुजाऱ्याने दोघेही मायलेकींना तीन दिवस स्वत:च्या घरी ठेवून घेतले. त्यानंतर २४ जानेवारी २०१५ रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास पीडित मुलीवर बलात्कार केला. या घटनेसंदर्भात याच दिवशी पुराडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक खरे यांनी केला व आरोपी कुमोटी याच्या विरोधात गडचिरोलीच्या जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. गुरूवारी विशेष सत्र न्यायाधीश यू. एम. पदवाड यांनी सर्व साक्षीपुरावे तपासून तसेच दोन्ही बाजुच्या वकीलांचा युक्तीवाद ऐकून आरोपी कुमोटी यास भादंविचे कलम ३७६ अन्वये सात वर्षांचा सश्रम कारावास व पाच हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली. या प्रकरणी सरकारी पक्षातर्फे अॅड. अनिल प्रधान यांनी काम पाहिले. (स्थानिक प्रतिनिधी)
भोंदू पुजाऱ्यास सात वर्षांचा कारवास
By admin | Updated: October 29, 2016 01:52 IST