कोटगल बॅरेजसाठी उपोषण : देवराव होळी यांची माहितीगडचिरोली : ९ मार्चपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होत आहे. या अधिवेशनात जिल्ह्यातील समस्यांशी संबंधित २० लक्षवेधी, ३२ तारांकित प्रश्न मांडले जाणार आहेत. त्याचबरोबर अर्धा तास चर्चा केली जाईल, सिंचनाच्या दृष्टीने कोटगल बॅरेजचे बांधकाम होणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे या बॅरेजसाठी निधी देण्यात यावा, या मागणीसाठी विधानसभेच्या पायऱ्यांवर उपोषणाला बसून निधीची मागणी केली जाणार आहे, अशी माहिती गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आ. डॉ. देवराव होळी यांनी पत्रकार परिषदेत दिली. झाड्या समाजाचा अनुसूचिमध्ये समावेश करावा, बंगाली समाजाला जातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे, कोट्यवधी रूपये खर्चुन गडचिरोली येथे महिला रुग्णालय बांधण्यात आले आहे. मात्र या रुग्णालयासाठी पदमान्यता शासनाने दिली नसल्याने कर्मचारी भरती रखडली आहे. शासनाने पदमान्यता द्यावी, निधी खर्च न करणाऱ्या विभाग प्रमुखांवर कारवाई करावी, वनसंवर्धन कायदा शिथील करण्यासाठी केंद्र शासनाकडे शिफारस करावी, ओबीसींचे आरक्षण पूर्ववत १९ टक्के करावे, सावरगाव, मुधोली, जयरामपूर, फराडा, मोहुर्ली, कुंभी, रानमूल, पेंढरी येथील जलसंवर्धनाच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला आहे. याची चौकशी करावी, सांबा मसुरी धानाच्या एजंटवर कारवाई करावी, नगर पंचायतीत रोहयोची कामे सुरू करावी, जलयुक्त शिवारच्या कामामध्ये गैरव्यवहार झाला आहे. याची चौकशी करावी, चामोर्शी कृ.उ.बा.स. व जिल्हा परिषदेच्या वन महसूल कामांची चौकशी करावी आदी प्रश्न विधानसभेत उपस्थित केले जाणार असल्याची माहिती आ. डॉ. देवराव होळी यांनी दिली आहे. यावेळी प्रमोद पिपरे, सुधाकर येनगंधलवार, गजानन येनगंधलवार, प्रशांत भृगुवार, अविनाश महाजन, रेखा डोळस व भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)
अधिवेशनात ५२ प्रश्न मांडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2016 00:55 IST