लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : धानोरा तालुक्यातील सर्च(शोधग्राम) येथील मॉ दंतेश्वरी धर्मादाय दवाखान्यात शुक्रवारी शस्त्रक्रिया शिबीर घेण्यात आले. या शिबिरात गर्भाशयासंबंधी विकार, हर्निया, मुतखडा, गलगंड, मूळव्याध, भगंदर यासह इतरही विकारांच्या तब्बल ९२ शस्त्रक्रिया करण्यात आल्या. गडचिरोलीसह भंडारा, चंद्रपूर, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील रुग्णांवर या शिबिरात उपचार झाले.ग्रामीण भागातील लोक बरेचदा दुखणे अंगावर काढतात. त्यामुळे सहज बरे होणारे आजार अनेकदा शस्त्रक्रियेपर्यंत येऊन पोहोचतात. सर्चमध्ये आलेल्या रुग्णांवर उपचार करताना ही बाब प्रकर्षाने लक्षात आल्याने, अशा रुग्णांवर उपचार करण्यासाठी सर्चद्वारे २००५ पासून दरवर्षी शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केले जाते. गत चार ते पाच महिन्यात मॉ दंतेश्वरी दवाखान्यात उपचारासाठी आलेल्या रुग्णांपैकी शस्त्रक्रियेची गरज असलेल्यांसाठी शुक्रवारी शस्त्रक्रिया शिबीर घेण्यात आले. यावेळी तब्बल ९२ रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. १६ वैद्यकीय तज्ज्ञांच्या चमूने शस्त्रक्रिया करून रूग्णांवर औषधोपचार केले. यामध्ये प्रामुख्याने महिलांच्या गर्भाशयातील गाठी, गर्भाशयातील रक्तस्त्राव, गर्भाशय बाहेर येणे, यासह मुतखडा, गलगंड, हर्निया, मूळव्याध, भगंदर, फिशर आणि इतरही आजाराच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या.जिल्ह्यात हळूहळू नसबंदी शस्त्रक्रियेचे प्रमाण वाढत आहे. पण अनेकदा केलेली नसबंदी उघडण्याचीही गरज निर्माण होते. ही गरज लक्षात घेऊन केलेली नसबंदी उघडण्याच्या शस्त्रक्रियाही यावेळी करण्यात आल्या. सोबतच जळालेल्या बोटांवर प्लॅस्टिक सर्जरीही या शिबिरात झाली.कोल्हापूर, सांगली, सातारा, लोणंद, जळगाव, अकोला येथील १६ डॉक्टरांच्या चमूने सदर शस्त्रक्रिया केल्या. यवतमाळ आणि नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थीही शिबिरात मदतीसाठी सहभागी झाले होते. रुग्णालयाच्या संचालक डॉ. राणी बंग यांच्या मार्गदर्शनात सदर शिबीर घेण्यात आले. डॉ. रवींद्र वोरा नेतृत्वात डॉ. संजय शिवदे, डॉ. महेश प्रभू, डॉ. नमिता प्रभू, डॉ. संपत वाघमारे, डॉ. गुर्जर, डॉ. किशोर वनखेडे, डॉ. सुदर्शन नवाल, डॉ. शिंत्रे, डॉ. सलिल बरसोडे आणि डॉ. तरुण गुप्ता यांनी या शस्त्रक्रिया केल्या. डॉ. राजा पाटील, डॉ. शरयू बेलापुरे, डॉ. नीलेश कोरडे आणि डॉ. अनिल साळोक यांनी भूलतज्ञ म्हणून भूमिका सांभाळली. सर्चच्या वैद्यकीय चमूतील डॉ. योगेश कालकोंडे, डॉ. मृणाल कालकोंडे, डॉ. वैभव तातावार, डॉ. दत्ता भलावी, डॉ. मयूरी भलावी, डॉ. अभिषेक पाटील, डॉ. कोमल भट यांच्यासह संपूर्ण रुग्णालय चमूने शिबिराची व्यवस्था सांभाळली.
सर्चमध्ये ९२ शस्त्रक्रिया यशस्वी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 06:00 IST
ग्रामीण भागातील लोक बरेचदा दुखणे अंगावर काढतात. त्यामुळे सहज बरे होणारे आजार अनेकदा शस्त्रक्रियेपर्यंत येऊन पोहोचतात. सर्चमध्ये आलेल्या रुग्णांवर उपचार करताना ही बाब प्रकर्षाने लक्षात आल्याने, अशा रुग्णांवर उपचार करण्यासाठी सर्चद्वारे २००५ पासून दरवर्षी शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केले जाते.
सर्चमध्ये ९२ शस्त्रक्रिया यशस्वी
ठळक मुद्दे१६ वैद्यकीय तज्ज्ञांनी केले उपचार : गडचिरोलीसह पूर्व विदर्भातील रूग्णांना दिलासा