'मौत का कुआं...' सरपंचाच्या पतीची सासूच्या विहिरीत आत्महत्या

By गेापाल लाजुरकर | Published: April 21, 2024 09:52 PM2024-04-21T21:52:37+5:302024-04-21T21:52:46+5:30

मरेगावातील घटना : पंधरा वर्षांत चौघांनी एकाच ठिकाणी संपविले जीवन

Sarpanch's husband commits suicide in his mother-in-law's well | 'मौत का कुआं...' सरपंचाच्या पतीची सासूच्या विहिरीत आत्महत्या

'मौत का कुआं...' सरपंचाच्या पतीची सासूच्या विहिरीत आत्महत्या

गडचिरोली : सरपंचाच्या पतीने आपल्याच सासूच्या गावालगतच्या विहिरीत  उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास गडचिरोली तालुक्याच्या मरेगाव येथे उघडकीस आली. गेल्या १५ वर्षांत येथे आजच्या घटनेसह चौघांनी आत्महत्या केल्याने ही विहीर  'मौत का कुआं' बनली आहे.

अरुण कवळू अलाम (५२) रा. मरेगाव , असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे. अरुण अलाम हे रविवारी सकाळपासूनच घरून बेपत्ता होते. सकाळी ११ वाजेपर्यंत ते घरी परत न आल्याने सरपंच पत्नी मालता अलाम यांच्यासह कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला. दरम्यान, मरेगाव टोलीसह गाव परिसर पालथा घातला. तरीही त्यांचा पत्ता लागला नाही. अखेर दुपारी तीन वाजता मौशीखांब मार्गावर गावापासून अवघ्या दीडशे मीटर अंतरावर असलेल्या विहिरीत पाहणी केली असता तेथील पाणी गढूळ असल्याचे दिसून आले. तेव्हा अलाम कुटुंबीयांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. विशेष म्हणजे, ही विहीर अलाम यांची सासू लीलाबाई उईके यांच्या मालकीची आहे. कुटुंबीयांच्या मनात शंका निर्माण होताच सदर विहिरीचे पाणी कृषिपंपाच्या सहाय्याने उपसण्यात आले. संपूर्ण पाणी उपसले असता अरुण अलाम हे विहिरीच्या तळाशी गाळामध्ये मृतावस्थेत फसलेले आढळले. खात्री होताच पोलिस पाटील अण्णाजी कुळसंगे यांनी आरमोरी पोलिसांना माहिती दिली. सायंकाळी उशिरापर्यंत मृतदेह बाहेर काढून आरमोरी उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले.


वर्षभरापूर्वी लहान भावानेही याच विहिरीत केली आत्महत्या

मरेगावापासून अगदी दीडशे मीटर अंतरावर रस्त्यालगत असलेल्या लीलाबाई उईके यांच्या शेतातील विहिरीत गेल्या पंधरा वर्षांत चार लोकांनी आत्महत्या केली. १५ वर्षांपूर्वी अरुण अलाम यांचे लहान भाऊ बंडू कवळू अलाम तसेच श्रेया गेडाम यांनी वेगवेगळ्या दिवशी आत्महत्या केली होती. मागील वर्षी जीवन मसराम यांनी याच विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर आता रविवारी अरुण अलाम यांनी आत्महत्या केली. त्यामुळे ही विहीर आता 'मौत का कुआं' बनली आहे.

Web Title: Sarpanch's husband commits suicide in his mother-in-law's well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.