अहेरी : अहेरी उपविभागातील तालुक्यांमध्ये जाणाऱ्या रस्त्याची दूरवस्था झाली आहे. गेल्या कित्येक वर्षापासून या रस्त्यांचे बांधकाम दुरूस्ती झालेली नाही. तसेच अनेक नवीन रस्त्यांची कामे प्रलंबित आहेत. शासनाने या कामांकडे तत्काळ लक्ष द्यावे, अशी मागणी अहेरी जिल्हा निर्माण कृती समितीने केली आहे.आलापल्ली-अहेरी-कागजनगर रेल्वे मार्ग निर्माण करून देवलमरी येथे सिमेंट उद्योग निर्माण करावे व अहेरी उपविभागातील रस्त्यांची त्वरित दुरूस्ती करावी, अशी मागणी अहेरी जिल्हा निर्माण कृती समितीच्यावतीने सार्वजनिक बांधकाम विकासमंत्री यांना उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत देण्यात आलेल्या निवेदनातून केली आहे. अहेरी येथील रस्ते पूर्णत: उखडलेले आहेत. देवलमरी, वेलगुर, एटापल्ली, भामरागड हे प्रमुख मार्ग अनेक दिवसांपासून दयनिय अवस्थेत आहेत. परंतु या रस्त्याच्या दुरूस्तीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे पूर्णत: दुर्लक्ष होत आहे. त्याबरोबरच अहेरी उपविभागातील ग्रामीण रस्ते दुरवस्थेत आहेत. रस्त्याच्या दुरव्यवस्थेमुळे अहेरी आगारामार्फत दुर्गम भागात सोडल्या जाणाऱ्या बसेसही बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना गावाला ये-जा करतांना त्रास सहन करावा लागत आहे. बस व इतर साधनांचा परिसरात अभाव असल्याने अनेक व्यवसायावरही परिणाम होत आहे. त्यामुळे अहेरी उपविभागातील विकास खुंटला आहे. उद्योग धंद्यांचा अभाव असल्यामुळे या भागात रोजगाराची निर्मिती करावी, असे निवेदनात म्हटले आहे. निवेदन देताना समितीचे अध्यक्ष रघुनाथ तलांडे, पवन कोसरे, मनोज मडावी, राहुल मडावी, अजय चुधरी, सुरज कोसरे, श्रावण कोसरे, क्रिष्णा औतकार उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
अहेरी भागात रस्त्याचे काम रखडले
By admin | Updated: August 19, 2014 23:43 IST