गडचिरोली : जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या सिरोंचा तालुक्यातील तहसीलदार व नायब तहसीलदार यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. तसेच पोलिसांच्या माध्यमातून त्यांना तत्काळ सिरोंचा मुख्यालयातून हलवून गडचिरोलीत दाखल करण्यात आले, अशी माहिती मिळाली आहे.सिरोंचा येथील तहसीलदार सूर्यकांत येवले व नायब तहसीलदार तेलंग हे कार्यरत होते. त्यांच्या कार्यकाळात सिरोंचा तालुक्यात कोतवाल पदांची भरती प्रक्रिया झाली होती. या भरती प्रक्रियेबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी आल्या होत्या. तर काही दुर्गम भागातील नागरिकांनी नक्षलवाद्यांकडेही याबाबत तक्रारी दिल्या होत्या, अशी परिसरात चर्चा आहे. नक्षलवाद्यांकडून या तक्रारींची गंभीर दखल घेण्यात आली होती, असे सांगण्यात येत आहे. याप्रकाराची माहिती पोलीस प्रशासनाला होताच दोनही महसूल अधिकाऱ्यांना तत्काळ सिरोंचा येथून गडचिरोलीला हलविण्यात आले. त्यानंतर तहसीलदार येवले यांची वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयात तर नायब तहसीलदार तेलंग यांची भंडारा येथे बदली करण्यात आली आहे. त्यांना भारमुक्तही करण्यात आले असून या घटनेनंतर तहसीलदारांना पोलिसांनी अटक केल्याची चुकीची अफवा पसरली होती. याबाबत पोलीस प्रशासनाने कमालिची गोपनियता पाळलेली होती. (जिल्हा प्रतिनिधी)
महसूल अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली
By admin | Updated: June 25, 2014 23:45 IST