ओव्हरलोड वाहतुकीला आळा घालावा
गडचिराेली : नागरी वसाहतीमध्ये जडवाहतुकीला आळा घालावा, अशी मागणी करण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून शहरातील अंतर्गत भागातील लहान रस्त्यांवरही अवजड वाहने नेण्यात येत असल्याने या रस्त्यांची पूर्णत: वाट लागली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
अनुदान देण्याची मागणी
कुरखेडा : सरकी ढेपीचे, तसेच इतरही साहित्याचे भाव गगनाला भिडले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह दूध उत्पादक संकटात सापडले आहे. शासनाने ढेपचे दर कमी करून दिलासा देण्याची मागणी करण्यात आली आहे. शेतकरी दुग्ध व्यवसायासाठी गाई, म्हशी, शेळ्या, आदी जनावरे पाळत आहे. मात्र महागाईमुळे अडचण जाते.
स्टंटबाजीमुळे प्रवाशांचा जीव टांगणीला
गडचिराेली : अलीकडे युवा अवस्थेतील तरुणांमध्ये भरधाव वाहन चालविणे व स्टंटबाजीची जीवघेणे क्रेझ निर्माण झाली आहे. रात्री आणि दिवसादेखील हा प्रकार जोरात चालला असल्याने रस्त्यावरून चालणाऱ्या पादचाऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. याकडे पोलीस प्रशासनाले लक्ष द्यावे, अशी मागणी केली जात आहे.
ओसाड वनजमिनीवर वृक्ष लागवड करा
एटापल्ली : तालुक्यातील अनेक गावांलगत व पहाडावर असलेल्या वनजमिनी वृक्षांअभावी ओसाड पडलेल्या आहे. त्या ठिकाणी वृक्षलागवड करावी, अशी मागणी वन्यप्रेमींकडून होत आहे. बऱ्याच स्थानी वृक्षतोड झाल्याने व वृक्ष लागवड केली नसल्याने वनजमिनीचे वन अधिपत्याखालील क्षेत्र कमी झाले आहे. त्यामुळे पर्यावरणाच्या संतुलनासाठी वनाचे संवर्धन होणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने गवत व मिश्र रोपवन कार्यक्रम राबवून वनविभागाने वृक्ष लागवड करणे गरजेचे आहे.
अतिक्रमण हटाव मोहीम थंडबस्त्यात
गडचिराेली : शहरातील विविध मार्गांवर दुकानदार व काही नागरिकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले. काही अतिक्रमणधारकांनी स्वत:हून अतिक्रमण हटविले. मात्र, बरीच अतिक्रमणे ‘जैसे-थे’च आहेत.
शासकीय निवासस्थाने झाली ओसाड
आलापल्ली : शासनाने लाखो रुपये खर्च करून येथे कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने बांधून घेतली. मात्र, शासकीय कर्मचारी या निवासस्थानांना ‘खो’ देत असल्याने कर्मचाऱ्यांना देखभालीअभावी ही निवासस्थाने ओसाड झाली आहेत.
चामोर्शी मार्गाच्या कडेला वाहनांवर बंदी घाला
गडचिरोली : इंदिरा गांधी चौकाकडून चामोर्शी मार्गाने सेमानाकडे प्रचंड वाहतूक वाढली आहे. दरम्यान, या मार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजूला चारचाकी व दुचाकी वाहने उभ्या केल्या जातात. यामुळे आवागमन करणाऱ्या वाहनांना रस्ता उरत नाही. परिणामी अपघाताची शक्यता बळावली आहे.
नियमित लाईनमन नसल्याने त्रास
सिराेंचा : तालुक्यातील बहुतांश गावात लाईमनकडे अनेक गावांचा पदभार आहे. ग्रामीण भागामध्ये वीज जाण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे लाईनमन द्यावा, अशी मागणी केली जात आहे.
बाजारात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
गडचिराेली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्स ठेवणे गरजेचे आहे. यासंदर्भात प्रशासनाकडून वेळोवेळी सूचना केल्या जात आहे. असे असतानाही रविवारी आठवडी बाजाराच्या दिवशी भाजीपाल्याच्या दुकानांमध्ये सोशल डिस्टन्स न पाळता जीवनावश्यक साहित्याची खरेदी केली जात आहे. त्यामुळे वेळीच आळा घालणे गरजेचे आहे.
वाचनालये अद्यापही रिकामेच
गडचिराेली : लाॅकडाऊननंतर शासनाने वाचनालय सुरू करण्याची परवागी दिली आहे. मात्र, पाहिजे त्या प्रमाणात विद्यार्थीच येत नसल्याचे चित्र सध्या आहे. मागील काही वर्षांपासून स्पर्धा परीक्षा देऊन शासकीय अधिकारी बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून अनेकजण शहरात येऊन स्पर्धा परीक्षेचे शिकवणी वर्ग लावतात. अभ्यासिकेत बसणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, कोरोनाच्या टाळेबंदीमुळे ग्रामीण भागातील मुले परत गेली ती अद्यापही परतली नसल्याने अभ्यासिकेतील गर्दी ओसरली आहे.
सर्वच शेतकऱ्यांना योजनांचा लाभ द्या
अहेरी : रोहयोंतर्गत कृषी व सिंचन योजनांचा लाभ घेण्यासाठी ओबीसी लाभार्थ्यांना पाच एकरची कमाल जमीन धारणेची अट घालण्यात आली आहे. त्यामुळे ओबीसी शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. ही अट हटविण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. अनेक शेतकऱ्यांकडे पाच एकरपेक्षा अधिक जमीन आहे. मात्र, ही जमीन सिंचनाअभावी पडीक राहत असते. ओबीसी शेतकऱ्यांना इतर कृषी योजनांचा लाभ मिळत नाही.
डासांचा उच्छाद वाढला
काेरची : तालुक्यातील विविध गावांमध्ये अनेक नाल्या तुंबलेल्या आहेत. त्यामुळे सांडपाणी वाहून जाण्यास अडचण जात आहे. परिणाम, डासांचे प्रमाण वाढले असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.
गोरक्षण संस्थेच्या निर्मितीची मागणी
गडचिरोली: गडचिरोली शहरात गोरक्षण संस्था नाहीत. त्यामुळे अनेकदा बेवारस जनावरे, तसेच कत्तलीसाठी जात असलेले जनावर पकडून चंद्रपूर जिल्ह्यात लोहारा येथे पाठवावे लागतात. गोरक्षण संस्था निर्माण करण्याची मागणी आहे. गोरक्षण संस्था निर्माण करण्यासाठी एखाद्या स्वयंसेवी संस्थेने पुढाकार घेण्याची गरज आहे.
पेट्रोल चोरट्यांचा बंदोबस्त करावा
गडचिराेली : शहरात मागील काही दिवसांपासून पेट्रोल चोरांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. पेट्रोलचोर शाळा, महाविद्यालय, शहरातील विविध चौक तसेच कॉम्प्लेक्समधील वाहनतळातून पेट्रोल चोरी करतात. पोलिसांनी लक्ष द्यावे, अशी मागणी आहे.