पत्रपरिषद : दोषींवर कारवाई करण्याची मागणी गडचिरोली : भाष्कर तुकाराम बाळबुद्धे, सूमन तुकाराम बाळबुद्धे, दिगांबर तुकाराम बाळबुद्धे या तिघांनी महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना हाताशी घेऊन कुटुंबातील इतर सदस्यांना विश्वासात न घेता कुरखेडा तालुक्यातील अंगारा येथील सर्वे क्रमांक ७८ व ८३ वरील जवळपास सात हेक्टर जागेचे फेरफार केले व सदर जमीन आपल्या नावांनी करून घेतली. त्यामुळे सदर प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी अंगारा येथील त्रिभूवण बाळबुद्धे, नवरगाव येथील सारू नाकाडे व तळेगावच्या रत्नमाला कापगते यांनी गडचिरोली येथे मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेतून केली. यावेळी माहिती देताना त्रिभूवण बाळबुद्धे यांनी सांगितले की, फेरफार प्रक्रियेदरम्यान आपल्याला कोणत्याही प्रकारची माहिती देण्यात आली नाही. गैरअर्जदारांनी मृतक सगुणाबाई जना सुकारे यांची सात हेक्टर जमीन त्यांच्या मुलींना न देता आपल्या नावांनी करून घेतली. सदर चुकीच्या पद्धतीने झालेला फेरफार नागपूरच्या आयुक्तांनी रद्द केला आहे. तसेच गडचिरोलीच्या जिल्हा न्यायालयाने खारीज केला आहे. या सर्व प्रकरणात तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी, पोलीस पाटील यांचाही सहभाग आहे, असे त्रिभूवण बाळबुद्धे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
विश्वासात न घेता जमिनीचा केला फेरफार
By admin | Updated: February 22, 2017 02:08 IST