देसाईगंज : दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील शेतकऱ्यांनी धानाची विक्री व्यापारांना केल्यानंतर यंदा महामंडळाची धान खरेदी सुरू झाली़ शेतकऱ्यांनी कमी भावात धानाची विक्री केली आहे़ मात्र शेतकऱ्यांंकडून धान खरेदी केल्यानंतर त्याच धानाची विक्री जादा भावाने वखार महामंडळामार्फत केली जाते़ यामुळे शासन व्यापारांसाठी धान खरेदी केन्द्र सुरू करते की शेतकऱ्यांसाठी असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे़ ‘नेमेची येतो पावसाळा’ या उक्तीप्रमाणे या वर्षी देखील शासनाने वखार महामंडळामार्फत होणारी धान खरेदी केंद्र धानपीक निघाल्यानंतर फार उशिराने सुरू करण्यात आली. या धान खरेदी केंद्राचा खरा लाभ धान व्यापारी घेत आहेत़ रब्बीचे पिक निघाल्यानंतर त्या धानाची विक्री करून येणाऱ्या रक्कमेतून खरीपाच्या पिकांची तयारी करावी लागते़ त्यामूळे धान पीकनिघताच त्याची विक्री शेतकरी करीत असतात़ धान विक्रीतून शेतकऱ्यांना शासनातर्फे जादा हमी भावाने वखार मंडळाकडे धानाची विक्री करून नफा मिळवू शकते़ मात्र मागिल काही वर्षापासून पीक हाती आल्यावर दोन महिन्यानंतर महामंडळाचे धान खरेदी केंद्र्र सूरू होत आहेत़ याचा खरा फायदा धान खरेदी व्यापारांना मिळत आहे़ यावर्षी व्यापाऱ्यांनी १ हजार १६० रूपये धानाला भाव दिला आहे़ तर त्याच धानाला वखार महामंडळाने दोन महिन्यानंतर केंद्र सूरू होताच १ हजार ३०० भाव दिला आहे़ व्यापारी शेतकऱ्यांकडून कमी भावाने धान खरेदी करतात़ त्या धानाची साठवणूक करून वखार महामंडळामार्फत खरेदी केंद्र सूरू होताच त्या धानाची जादा भावाने विक्री करतात़ मात्र अंग मेहनत करून पिके काढणाऱ्या बळीराजाला नुकसान सहन करावी लागते.़ शासनाकडे वारंवार पाठपूरावा करूनही शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे शासन कानाडोळा करीत आहे़ धान व्यापारी व वखार महामंडळ यांचे साटेलोटे असल्यामुळेच शासन केवळ व्यापारांचे हित जोपासत असल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत़ लगतच्या जिल्ह्यात अगदी वेळेवर धान खरेदी केंद्र सुरू होत असतांना गडचिरोली जिल्ह्यात धान खरेदी केंद्र उशिरा सुरू होते.(प्रतिनिधी)
व्यापाऱ्यांसाठीच सध्या धान खरेदी
By admin | Updated: June 25, 2014 23:46 IST