आरमोरी : आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने आरमोरी तालुक्यात १० धान खरेदी केंद्रावर १७ मार्चपर्यंत ५८ हजार ७०५ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली आहे. आदिवासी विकास महामंडळाने यावर्षी आरमोरी तालुक्यात १० धान खरेदी केंद्र उघडले आहेत. यापैकी अंगारा धान खरेदी केंद्रावर सहा हजार ४६३, देलनवाडी १२ हजार ५८४, दवंडी १० हजार ४५, कुरंडी माल सहा हजार ६६८, मौशीखांब सात हजार ९३५, चांदाळा दोन हजार ५४८, पोटेगाव तीन हजार ७७०, पिंपळगाव चार हजार ८८६, उराडी तीन हजार ८०३ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. विहिरगाव येथे मात्र धान खरेदी करण्यातच आली नाही. खरेदी केलेल्या धानापैकी १० हजार ४५७ क्विंटल धान गोदामात सुरक्षित ठेवण्यात आले आहे. ३० हजार ९७ क्विंटल धानाची भरडाई करण्यात आली आहे. तर १८ हजार १५१ क्विंटल धान अजुनही उघड्यावरच आहे. सदर धान अवकाळी पाऊसामुळे खराब होण्याची शक्यता आहे. तर मोकाट जनावरेही सदर धान फस्त करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शासनाने तत्काळ धानाची उचल करावी, अशी मागणी आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या सभासदांनी केली आहे. दोन वर्षांपूर्वी आरमोरी तालुक्यातील धान खरेदी केंद्रावरील हजारो क्विंटल धान खराब झाले होते. धान उचलण्यास दिरंगाई झाल्यास यावर्षीही धानाची नासाडी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)
आरमोरी तालुक्यात ५८ हजार क्विंटल धान खरेदी
By admin | Updated: March 29, 2015 01:27 IST