तेलंगणाच्या आमदारांकडून पाहणी : १३ पिलरचे काम पूर्ण; ६४ कोटींचा खर्च होणारअहेरी : अहेरी लगतच्या प्राणहिता नदीवर अहेरी-गुंडेम या मार्गावर आंतरराज्यीय पुलाचे बांधकाम सध्या सुरू आहे. सदर बांधकाम प्रगतिपथावर असून तेलंगणा राज्याच्या शिरपूर-कागजनगरचे आ. कोनेरू कोनप्पा यांनी बुधवारी पूल बांधकाम स्थळाला भेट देऊन पाहणी केली. अहेरी-गुंडेम मार्गावरील आंतरराज्यीय पूल मार्च २०१८ पर्यंत पूर्ण करण्याकरिता प्रयत्न सुरू आहेत. पुलाच्या बांधकामात कुठल्याही प्रकारचा अडथळा येऊ नये, काम सुरळीत सुरू राहावे व यंदाच्या पावसाळ्यापूर्वी नदीतील संपूर्ण २६ पिलर बांधून पूर्ण व्हावे, याकरिता महाराष्ट्रातील तीन शेतकऱ्यांच्या जमिनीची आवश्यकता आहे. सदर पूल १ किमी पर्यंत लांब राहणार असून या पुलाच्या बांधकामावर जवळपास ६४ कोटी रूपये खर्च होणार आहे. सध्या तेलंगणा तीराजवळचे १३ पिलरचे काम पूर्णत्त्वास येत आहे. पावसाळ्यापूर्वी महाराष्ट्राच्या तीराजवळील १३ पिलरचे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न तेलंगणा सरकारच्या वतीने केला जाणार आहे. परंतु या तीरालगत तीन शेतकऱ्यांच्या जमिनी येत असल्याने सदर शेतकऱ्यांना बोलावून आ. कोनप्पा यांनी चर्चा केली. उच्च व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सदर पुलाचे बांधकाम होणार आहे. दोन्ही राज्याकडून सध्या सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याने मार्च २०१८ पर्यंत पुलाचे बांधकाम पूर्ण होऊ शकते, अशी माहिती आ. कोनप्पा यांनी दिली. पाहणीदरम्यान वांगेपल्ली घाटावर ग्रामस्थांशीही कोनप्पा यांनी चर्चा केली. यावेळी तेलंगणाच्या कवटालाचे पोलीस निरीक्षक अच्छेश्वरराव, वांगेपल्लीचे यशवंत मडावी, जहीर हकीम उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)तीन शेतकऱ्यांना मिळणार मोबदलाअहेरी-गुंडेम दरम्यान प्राणहिता नदीवर निर्माणाधीन आंतरराज्यीय पूल २६ पिलरवर उभा राहणार आहे. सध्या महाराष्ट्राच्या सीमेवरील १३ पिलरचे काम मार्गी लागणे बाकी आहे. उर्वरित पिलर उभारण्याकरिता जागा लागणार असून राज्यातील तीन शेतकऱ्यांच्या जमिनी या पुलाच्या हद्दीत येणार आहेत. त्यामुळे सदर शेतकऱ्यांशी तेलंगणा राज्यातील शिरपूर-कागजनगरचे आ. कोनेरू कोनप्पा यांनी चर्चा करून जमिनी वाजवी मोबदल्यात देण्याची मागणी केली. यावेळी शेतकरी बाबुराव सिडाम, राजू सिडाम, मल्लू पानेम यांच्याशी आ. कोनप्पा यांनी चर्चा केली व शेतकऱ्यांना राजी केले. या शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला दिला जाईल.
प्राणहिता पुलाचे काम प्रगतिपथावर
By admin | Updated: February 3, 2017 01:21 IST