गडचिरोली : गोकुलनगर वार्डात मागील १० वर्षापासून वास्तव्यास असलेल्या वैशाली अमृत आत्राम या महिलेस गडचिरोली पोलीस स्टेशनमधील मेश्राम नामक पोलिसासह इतर पाच पोलिसांनी मंगळवारी रात्री ११ वाजता तिच्या घरी जाऊन घर रिकामे करण्याची धमकी दिली, असा आरोप वैशाली आत्राम यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.वैशाली आत्राम व तिचे कुटुंब मागील १० वर्षापासून गोकुलनगर येथे वास्तव्यास आहेत. मागील दोन वर्षापासून अधुनमधून गडचिरोली पोलीस स्टेशनमधील पोलीस तिच्या घरी वर्दीवर व पोलिसांच्या सुमोमध्ये येऊन तिला घर रिकामे करण्याविषयी धमक्या देत आहेत. त्याचबरोबर १०० रूपयाच्या स्टॅम्प पेपरवर लिहून देण्यासाठी दुसऱ्या दिवशी पोलीस स्टेशनमध्ये येण्याचे बजावण्यात येत आहे. किंवा कोऱ्या स्टॅम्प पेपरवर तिने सही करावी, अन्यथा जबरदस्तीने घर खाली करून तुरूंगामध्ये डांबण्याची धमकी देण्यात येत होती. मंगळवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास पोलीस आले व त्यांनी नेहमीचीच धमकी दिली. त्यावेळी वैशाली ही घरी एकटीच होती. त्यामुळे ती अतिशय घाबरली. या नेहमीच्याच धमक्यामुळे त्रस्त झाल्यानंतर तिचा पती व ती बुधवारी पोलीस स्टेशनमध्ये गेले. झालेल्या प्रकाराची तक्रार दिली असता, सदर तक्रारसुद्धा स्विकारण्यास नकार दिला. त्यामुळे याबाबतची तक्रार तिने जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे.विशेष म्हणजे वैशाली व तिच्या कुटुंबियांचा पोेलिसांशी कोणताही संबंध नसतांना तिला घर खाली करण्याविषयी त्रास देण्यात येत आहे. सदर पोलिसांवर कारवाई करावी, अशी मागणी वैशाली आत्राम यांनी केली आहे. यावेळी लता ढोक, तिलोतमा हाजरा, अमृत आत्राम, रेणू दुर्गे, संध्या मरस्कोल्हे आदी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)
पोलिसांकडून घर रिकामे करण्याची महिलेला धमकी
By admin | Updated: June 26, 2014 23:12 IST