वाकडी-बोरी मार्गावर खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:36 AM2021-04-17T04:36:17+5:302021-04-17T04:36:17+5:30

लखमापूर बोरी : चामोर्शी तालुक्यातील अनेक ठिकाणच्या रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. त्यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. ...

Pits on the crooked road | वाकडी-बोरी मार्गावर खड्डे

वाकडी-बोरी मार्गावर खड्डे

Next

लखमापूर बोरी : चामोर्शी तालुक्यातील अनेक ठिकाणच्या रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. त्यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. वाकडी-लखमापूर बोरी मार्गावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाले असून, या रस्त्याची अवस्था बकाल झाली आहे.

तलावाचे सौंदर्यीकरण करा

चामोर्शी : शहरालगत असलेल्या तलावाचे सौंदर्यीकरण करण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत आहे. चामोर्शी शहरात फिरण्यासाठी व निवांत बसण्यासाठी प्रशस्त जागा नाही, त्यामुळे तलावाचे सौंदर्यीकरण करावे, अशी मागणी हाेत आहे.

सौरदिव्यांसाठी नव्याने बॅटऱ्या उपलब्ध करा

भामरागड : ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायतींनी सौरदिवे लावले आहेत. मात्र, यातील बहुतांश सौरदिव्यांच्या बॅटऱ्या चोरीला गेल्या आहेत. कियर, बेजूरसह अन्य गावांतील सौरदिवे केवळ शोभेच्या वस्तू बनल्या आहेत. त्यामुळे रात्रीच्या सुमारास गावात अंधार राहताे.

औषधांचे बिल न देणाऱ्यांवर कारवाई करा

देसाईगंज : गडचिरोली शहरातील बहुतांश औषध विक्रेते ओरिजनल बिल ग्राहकाला देत नाही. १० गोळ्यांच्या प्रत्येक स्ट्रिपवर किंमत असते. मात्र, ग्राहकाने पाच ते सहा गोळ्या खरेदी केल्यास त्यासाठी किती किंमत आकारली जाते, याचा थांगपत्ता नाही.

सिरोंचा भागात अवैध वृक्षतोड सुरूच

भामरागड : तालुक्यात जंगलातून मोठ्या प्रमाणावर अवैध वृक्षतोड करून तेलंगणा राज्यात तस्करी केली जाते. विशेष म्हणजे, वन कर्मचाऱ्यांनी अनेकदा तस्कारांवर कारवाई केली आहे, परंतु रात्रीच्या सुमारास ही तस्करी होत आहे.

नूतनीकरणाची प्रतीक्षा

अहेरी : सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत आलापल्ली-भामरागड मार्गावरील चंद्रा-ताडगावपर्यंतच्या रस्त्याचे खड्डे बुजविण्याचे काम संबंधित कंत्राटदाराकडून काही दिवसांपूर्वी करण्यात आले. मात्र, अल्पावधीतच रस्ता उखडला असल्याची ओरड परिसरातील नागरिकांनी केली आहे.

कुटुंब नियोजनाची गरज

मुलचेरा : लोकसंख्येला आळा घालण्यासाठी जनजागृती झाल्यानंतर कुटुंब नियोजन करण्याचे प्रमाण वाढले असले, तरी यामध्ये पुरुषांचे प्रमाण अत्यंत नगण्य आहे. कुटुंब नियोजनात महिला आघाडीवर आहेत. पुरुषांमध्ये जनजागृतीची गरज आहे. पुरुषांमध्ये नसबंदीबाबत गैरसमज आहे.

जळाऊ लाकडाचा तुटवडा

कोरची : येथे विविध विभागांचे कर्मचारी, अधिकारी वास्तव्य करतात; परंतु त्यांना वेळेवर जळाऊ लाकडे उपलब्ध होत नाही. स्थानिक नागरिकांना वनविभाग सरपणासाठी लाकूड उपलब्ध करून देण्यास दिरंगाई होत आहे. बहुतांश डेपोवर जळाऊ लाकडांचा तुटवडा निर्माण झाला आहे.

सुरक्षाकवचाविना डीपी

कुरुड : देसाईगंज तालुक्यातील अनेक ठिकाणी विद्युत कंपनीच्या डीपी खुल्या अवस्थेत पडून आहेत. कोकडी, तुळशी, विसोरा, विहीरगाव आदी भागात ही समस्या आहे. विद्युत पुरवठा या उघड्या डीपीमधून होत आहे. त्यामुळे त्यापासून केव्हाही धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मोकाट जनावरांचा हैदोस

जिमलगट्टा : गावातील मोकाट जनावरे रस्त्यावर बसून राहतात. नागरिकांना व शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मुख्य मार्गावर गावातील मोकाट जनावरे बसून राहत असल्यामुळे खराब झाला आहे. जनावरे रस्त्यावर बसून राहत असल्यामुळे तिथे त्यांचे शेण पडून राहत असल्याचे दिसते.

अपघात वाढले

चामोर्शी : मूल-चामोर्शी मार्गावर भेंडाळाच्या बसस्थानकावर गतिरोधक उभारणे आवश्यक आहे. चामोर्शी-मूलमार्गे, तसेच आष्टीकडे जाणारी वाहने भरधाव जातात. या ठिकाणी गतिरोधक नसल्याने अपघाताची शक्यता बळावली आहे. माेठे गाव असतानाही गतिरोधक नसल्याने अपघात वाढले आहेत.

बायोगॅस अनुदान ताेकडे

गडचिरोली : जिल्ह्यातील ९० टक्के कुटुंबांकडे पशुधन उपलब्ध आहे. त्यामुळे १०० टक्के अनुदानावर शासनाकडून बायोगॅस संयंत्र बांधून दिल्यास या कुटुंबांना बिनाखर्ची गॅसची सुविधा उपलब्ध होईल. ग्रामीण भागात गोधन आहे. गोधनापासून मिळणाऱ्या शेणाचा योग्य उपयोग आवश्यक आहे.

वास्तूची दुरुस्ती करा

सिरोंचा : ब्रिटिशकालीन सत्ताकाळात सिरोंचा तालुका मुख्यालयी हवामान खात्याच्या अखत्यारित असलेल्या पर्जन्यमापक वास्तूची दुरवस्था झाली आहे. पूर्णत: दगडाने बांधण्यात आलेल्या या वास्तूची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे. अनेक वर्षांपासून मागणी हाेत आहे.

दुग्ध योजना राबवा

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात दुधाळ जनावरांची संख्या घटायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे दुधाचे उत्पादन कमी होत चालले आहे. सहा वर्षांपूर्वी जिल्ह्यात ७५पेक्षा अधिक दुग्ध उत्पादक सहकारी संस्था कार्यरत होत्या. मात्र, त्यातील ६२ दुग्ध सहकारी संस्था बंद पडल्या आहेत.

Web Title: Pits on the crooked road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.