कुरखेडा : कोरचीकडून कुरखेडामार्गे आरमोरीकडे मोहफूल घेऊन जाणारे पीकअप वाहन कोरची-कुरखेडा मार्गावरील जांभूळखेडा गावाजवळ अनियंत्रित होऊन उलटले. या अपघातात वाहन चालकासह त्याचे सहकारी असे तिघे जण जखमी झाले. हा अपघात गुरुवारी (दि. २९) सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास घडला.
प्राप्त माहितीनुसार, मोहफूल घेऊन येणारे पीक वाहन (एमएच ३३, जी ११८५) जांभूळखेडा वळणाजवळ वळण घेत असताना चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि हे वाहन रस्त्यातच उलटले. अपघाताची माहिती कळताच पोलीस उपनिरीक्षक नारायण शिंदे, हवालदार बाबूराव उराडे, ललित जांभूळकर यांनी घटनास्थळावर दाखल होऊन रस्त्यावर उलटलेले वाहन नागरिकांचा सहकार्याने बाजूला केले. यावेळी घटनास्थळावरून प्रत्येकी ३० किलो वजनाचे ९ कट्टे मोहफूल (किंमत २१ हजार ६०० रुपये) जप्त केले.
या अपघातात चालकासह त्याचे ३ सहकारी जखमी झाल्याची माहिती आहे. त्यांना उपचाराकरिता गडचिरोली येथे हलविण्यात आले. वाहन चालकाविरोधात कुरखेडा पोलीस स्टेशनला महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये आणि निष्काळजीपणे वाहन चालवत स्वत:सह सहकाऱ्यांच्या दुखापतीस कारणीभूत ठरल्याने भादंवि कलम २७९, ३३७, ३३८, ४२७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.