गडचिराेली : शहरात हाेऊ घातलेल्या विकासकामाला आपला कधीही विराेध नव्हता. मात्र, विकासकामे करताना ती दर्जेदार व्हावीत, अशी आपली अपेक्षा असते. शहरातील बहुचर्चित भूमिगत गटार लाईनचे काम सध्या सुरू आहे. या कामाबाबत आपण नेहमीच विराेधात राहिलो असून, या संदर्भात यापूर्वी अनेक तक्रारीवजा सूचना करण्यात आल्या आहेत. कंत्राटदार व संबंधित एजन्सी यांचा मनमानी कारभार सुरु असून, शहरातील जनतेला वेठीस धरण्याचे काम ते करत आहेत. त्यामुळे या संपूर्ण कामाची चाैकशी करावी, अशी मागणी काॅंग्रेसचे गडचिराेली शहराध्यक्ष तथा नगरसेवक विधाते यांनी केली आहे.
कंत्राटदारांनी शहरात गटार लाईन टाकण्याकरिता अंतर्गत रस्ते खाेदले. मात्र, त्याची वेळीच डागडुजी केली नाही. त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला. ज्या रस्त्याची डागडुजी करण्यात आली आहे, त्या रस्त्यावर अनेक ठिकाणी चेंबर वर आले आहेत. रस्त्याची लेवल समांतर नसल्यामुळे दुचाकीस्वारांसह चारचाकी वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या रस्त्यावर गटार लाईन टाकण्यात आली. चेंबर मुख्य रस्यापेक्षा एक ते दीड फूट उंच आहे. त्यामुळे या रस्त्यावरून वाहतूक करताना नागरिकांना त्रास हाेत हाेता. हे लक्षात घेऊन व्यापारी असाेसिएशनने या चेंबरची उंची कमी करावी, अशी मागणी केली. त्यानंतर या चेंबरची उंची कमी करण्याचे कंत्राटदाराने मान्य केले. याचा अर्थ काय, असा प्रश्न विधाते यांनी विचारला आहे.
नियाेजन आराखड्यानुसार हे काम झाले असेल तर चेंबरची उंची कमी केल्यास भविष्यात इतर प्रभागात अडचण निर्माण हाेणार नाही का? असा प्रश्न करत या कामाची उच्चस्तरीय चाैकशी करावी, अशी मागणी विधाते यांनी केली आहे.