कोरचीत पाण्यासाठी पायपीट

By Admin | Published: January 7, 2016 02:05 AM2016-01-07T02:05:32+5:302016-01-07T02:05:32+5:30

संपूर्ण कोरची शहराला पाण्याचा पुरवठा करण्यासाठी शहरात एकच पाणी टाकी बांधण्यात आली आहे.

Pavement for clean water | कोरचीत पाण्यासाठी पायपीट

कोरचीत पाण्यासाठी पायपीट

googlenewsNext

एकच पाणीटाकी : अतिक्रमणाने वाहतुकीचा खोळंबा, कचऱ्याने तुंबल्या नाल्या
लिकेश अंबादे कोरची
संपूर्ण कोरची शहराला पाण्याचा पुरवठा करण्यासाठी शहरात एकच पाणी टाकी बांधण्यात आली आहे. त्यामुळे बहुतांश वॉर्डांमध्ये पाण्याचा पुरवठा होत नाही. नवीन वस्तीमध्ये नगर पंचायतीने अजूनही पाणी पाईपलाईन टाकली नाही. त्यामुळे या भागातील महिलांना वर्षभर पाण्यासाठी भटकंती करावी लागते. पाण्याच्या समस्येबरोबरच बंद पथदिवे, कचऱ्याने तुंबलेल्या नाल्या, रस्त्यावरून वाहणारे सांडपाणी, रस्त्याच्या लगत फेकण्यात येत असलेला कचरा व आठवडी बाजाराच्या दिवशी होणारी वाहतुकीची कोंडी यामुळे कोरचीवासीय त्रस्त झाले आहेत. नगर पंचायतीने या गंभीर बाबीकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

कोरची नगर पंचायत झाल्याची घोषणा झाल्याबरोबरच नागरिकांमध्ये प्रचंड आनंद निर्माण झाला होता. तरूणांनी त्या दिवशी जल्लोषही साजरा केला. नगर पंचायत स्थापन झाल्याने अधिकचा निधी मिळून शहराचा विकास होईल, अशी अपेक्षा या जल्लोषामागे होती. मात्र नगर पंचायत स्थापन होऊन सहा महिन्यांचा कालावधी उलटला तरी अजूनपर्यंत परिस्थितीमध्ये काहीच फरक पडला नाही. उलट नगर पंचायत स्थापन झाल्यामुळे काही कामे ठप्प पडली असल्याचे दिसून येते. शहरातील अनेक वॉर्डांमध्ये पथदिवे नाहीत. त्यामुळे शहरात अंधाराचे साम्राज्य असल्याचे दिसून येते. काही वॉर्डांमध्ये विद्युत खांब बसविण्यात आले नाही.
कोरची येथे आठवडी बाजार भरतो. परिसरातील १५ ते २० गावातील नागरिक आठवडीबाजारासाठी येतात. त्यामुळे आठवडी बाजाराच्या दिवशी कोरची शहरात मोठ्या प्रमाणात गर्दी उसळते. मुख्य रस्त्याच्या बाजुलाच दुकानदार दुकान लावत असल्याने वाहतुकीची कोंडी आणखीनच वाढते.
कोरची तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये कार्यरत असलेले कर्मचारी कोरची येथेच राहून ये-जा करतात. कोरची हे तालुकास्थळही आहे. त्यामुळे या शहराची लोकसंख्या वाढत चालली आहे. त्यानुसार नगर पंचायतीकडे जास्तीचे स्वच्छता कर्मचारी असणे गरजेचे आहे. मात्र नगर पंचायत स्थापन होऊनही कर्मचाऱ्यांची संख्या वाढली नाही. त्यामुळे कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे.

विहीर बनली कचराकुंडी
कोरची शहरातील बाजारालगत विहीर आहे. मागील काही वर्षांपासून नागरिक या विहिरीचे पाणी भरत नाही. त्यामुळे नागरिकांनी या विहिरीचा उपयोग कचरा टाकण्यासाठी सुरू केला आहे. पावसाळ्यात पावसाचे पाणी साचून कचरा कुजतो व याचा दुर्गंध सभोवतालच्या नागरिकांना पसरत आहे. सभोवतालच्या नागरिकांनाही सामाजिक जबाबदारीचे काहीच भान नाही. तेच या ठिकाणी कचरा टाकत आहेत. दुसरे म्हणजे नगर परिषदेनेही जवळपासच्या परिसरात कचराकुंडी ठेवली नाही. त्यामुळे विहीरच कचराकुंडी माणून विहिरीमध्ये कचरा टाकला जात आहे. कचऱ्याची समस्या संपूर्ण कोरची शहरात गंभीर आहे. कचराकुंड्या ठेवल्यास ही समस्या दूर होऊ शकते. मात्र ग्रामपंचायतीनंतर नगर पंचायतीनेही कचराकुंड्या ठेवण्याबाबत फारशी गंभीरता दाखविली नाही. रस्त्याच्या कडेला कचऱ्याचे ढिगारे वाढले आहेत. सदर ढिगारे उचललेसुद्धा जात नाही. त्यामुळे वर्षोनवर्ष कचरा पडून राहतो. काही प्लास्टिकचा कचरा जाळला जात असल्यामुळे प्रदुषणाची समस्या निर्माण झाली आहे. नगर पंचायतीने कचऱ्याची समस्या सोडवावी, अशी मागणी आहे.

Web Title: Pavement for clean water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.