हजारों बालिका योजनेपासून वंचित : १८ वर्षानंतर मिळणार एक लाख रूपयेगडचिरोली : बीपीएलधारकांच्या मुलींसाठी राज्य शासनाने सुकन्या योजना सुरू केली. या योजनेचा लाभ दीड वर्षाच्या कालावधीत जिल्ह्यातील ३११ मुलींना देण्यात आला असून या मुलींना आता वयाच्या १८ व्या वर्षी एक लाख रूपये रक्कम मिळणार आहे. दिवसेंदिवस मुलींचे प्रमाण घटत चालले असल्याने भविष्यात गंभीर समस्या निर्माण झाली आहे. अनेक पालक मुलीला अजूनही बोजा समजातात. समाजाची मानसिकता अजूनही बदलली नाही. मुलींच्या जन्माचे प्रमाण वाढावे, या उद्देशाने यापूर्वीच्या आघाडी शासनाने १ जानेवारी २०१४ पासून सुकन्या योजना सुरू केली. या योजनेंतर्गत मुलीच्या नावाने राज्य शासन विमा काढणार असून विम्याची रक्कम तिच्या १८ व्या वर्षानंतर मिळणार होती. राज्य शासनाने या योजनेंतर्गत प्रत्येक मुलीच्या नावाने जवळपास १८ हजार रूपये जमा केले असून १८ वर्षानंतर १ लाख रूपये मिळणार आहेत. या योजनेच्या अटीनुसार संबंधीत मुलीचा विमा एक वर्ष वयाच्या पूर्वीच काढणे गरजेचे होते. मुलीचा अर्ज पालकांच्या मदतीने पाठविण्याची जबाबदारी पंचायत समिती स्तरावरील बालकल्याण अधिकाऱ्याकडे सोपविण्यात आली होती. या योजनेचा लाभ जिल्हाभरातील केवळ ३११ मुलींना देण्यात आला आहे. १ जानेवारी ते ३१ मार्च २०१४ पर्यंत ७२ मुलींचा तर १ एप्रिल ते ३१ डिसेंबर २०१४ पर्यंत २३९ असा एकूण ३११ मुलींचा विमा काढून त्यांना सुकन्या योजनेचा लाभ दिला गेला आहे. गडचिरोली जिल्ह्याची लोकसंख्या जवळपास ११ लाख आहे. एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या जिल्ह्यात केवळ ३११ मुलींना लाभ देण्यात आला आहे. यावरून प्रशासन या योजनेबद्दल जनजागृती करण्यात अपयशी ठरला असल्याचे दिसून येते. या योजनेच्या अटीनुसार एक वर्षाच्या कालावधीत विमा काढणे गरजेचे आहे. मात्र एक वर्षाच्या आत अनेक मुलींचा विमा काढण्यात आला नाही. त्यामुळे सदर मुली आता या योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. युती शासनाने ही योजना बंद करून त्याऐवजी दुसरी योजना आणण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे जानेवारी २०१५ नंतरचे जे अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यांचा विमा काढणे बंद झाले आहे. (नगर प्रतिनिधी)
ेकेवळ ३११ मुली बनल्या सुकन्या
By admin | Updated: August 15, 2015 00:25 IST