घोट : घोट वनपरिक्षेत्रांतर्गत विकासपल्ली उपक्षेत्राच्या हद्दीत येणाऱ्या गरंजी कक्षा क्रमांक ४१५ मध्ये अवैधरीत्या सागवन वृक्षाची तोड करताना वनाधिकाऱ्यांनी एका आरोपीस रंगेहात अटक केल्याची घटना १३ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली.अटक करण्यात आलेल्या वन तस्कराचे नाव परमानंद मनिंद्र सरकार (२८) रा. विकासपल्ली असे आहे. प्राप्त माहितीनुसार, १३ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास आलापल्लीचे उपविभागीय वनाधिकारी एच. एस. वाघमोडे व घोटचे वनपरिक्षेत्राधिकारी किरण पाटील तसेच काही वनकर्मचारी बांबू प्लाँटची पाहणी करीत होते. दरम्यान, नजीकच २०० मीटर अंतरावरून एक मोठा वृक्ष कोसळल्याचा आवाज आला. त्यानंतर वनाधिकारी व वनकर्मचाऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव व घेऊन पाहणी केली असता नुकतेच तोडलेले एक सागवन वृक्ष जमिनीवर पडल्याचे निर्दशनास आले. वन कर्मचाऱ्यांनी वनतस्कराच्या दिशेने धाव घेतली. वन तस्कर परमानंद सरकार याला ताब्यात घेण्यात वन विभागाला यश मिळाले. मात्र दोन वन तस्कर फरार होण्यास यशस्वी झाले. घटनास्थळावर २.६८ घनमीटरच्या सागवन वृक्षाची कत्तल केल्याचे निदर्शनास आले. या वृक्षाची किंमत २ लाख ५० हजार रूपये असल्याचे वनाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. यावेळी विकासपल्लीचे क्षेत्रसहायक नरखेडकर, वनरक्षक के. आर. परसाके, सय्यद, कचलामी, राजूरकर, मंडल, अंबादे, लांजेवार आदी वन कर्मचारी उपस्थित होते. याप्रकरणातील फरार दोन आरोपींना शोधण्याच्या कामात वनाधिकारी व वन कर्मचारी लागले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास घोट वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्राधिकारी किरण पाटील करीत आहेत. वन विभागाच्या कारवाईने वनतस्करांचे धाबे दणाणले आहे. (वार्ताहर)
सागवान तोड प्रकरणी एकास अटक
By admin | Updated: September 15, 2014 00:07 IST