मुंबईत केवळ पाच जण पोहोचले : काँग्रेसकडे तिकीट मागणाऱ्यांचीअभिनय खोपडे - गडचिरोलीएकेकाळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची तिकीट मिळविण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागत होती. वेळप्रसंगी दिल्लीही गाठावी लागे. मात्र लोकसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराचा २ लाख ३६ हजारावर मतांनी दारूण पराभव झाल्यानंतर काँग्रेसची उमेदवारी घेण्यासाठी इच्छुकांची संख्या रोडावून गेली आहे. गडचिरोली जिल्ह्यात दोन मतदार संघात उमेदवारीसाठी केवळ ५ जणांनी मुंबई येथे टिळक भवनात गडचिरोली जिल्ह्यातून हजेरी लावल्याची माहिती मिळाली आहे. गडचिरोली जिल्ह्यात विधानसभेचे तीन मतदार संघ आहेत. यापैकी आरमोरी व गडचिरोली हे दोन मतदार संघ काँग्रेसकडे तर अहेरी मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यात आहे. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत गडचिरोली व आरमोरी क्षेत्रात काँग्रेस उमेदवारांनी निसटता विजय मिळविला होता. तर अहेरी विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार २६ हजारावर अधिक मतांनी अपक्ष उमेदवाराकडून पराभूत झाला होता. २०१४ मध्ये पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने गडचिरोलीच्या आमदारांनाच उमेदवारी दिली होती. त्यांचा २ लाख ३६ हजारावर मतांनी पराभव झाला. स्वत: ते प्रतिनिधित्व करीत असलेल्या गडचिरोली विधानसभा मतदार संघात ७० हजार ९ मतांनी ते पिछाडीवर होते तर आरमोरी विधानसभा क्षेत्रातही ४३ हजार मतांनी ते माघारले होते. अहेरीतही ४२ हजार मतांचा फटका त्यांना बसला. अशा परिस्थितीत आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाकडे इच्छुकांची संख्या रोडावलेली आहे. जिल्हास्तरावर केवळ १० जणांनी निरीक्षकांना मुलाखती दिल्या होत्या. मात्र मुंबई येथे तिकीट मागण्यासाठी प्रदेशस्तरावरील समितीकडे केवळ पाचच जण पोहोचलेत. गडचिरोलीतून तिघांनी तर आरमोरी क्षेत्रातून दोघांनी उमेदवारीसाठी मुलाखती दिल्या. यात दोनही विद्यमान आमदारांचा समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मात्र तिनही विधानसभा मतदार संघातून उमेदवारीसाठी अर्ज मागविले आहे. तसेच पक्षाच्यावतीने गडचिरोली विधानसभा क्षेत्रावरही दावा सांगण्यात आला आहे. काँग्रेस ७० हजाराने माघारल्यामुळे हा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात यावा, असा युक्तीवाद प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्यासमोर राकाँच्या नेत्यांनी केला आहे.
संख्या रोडावली
By admin | Updated: August 20, 2014 23:30 IST