लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) २५ जानेवारीपासून १४.९५ टक्के भाडेवाढ जाहीर केली. त्यामुळे जनवाहिनी असलेल्या लालपरीचा प्रवास महागला आहे. याचा फटका जिल्ह्यातील लाखो प्रवाशांना बसणार आहे. पूर्वी नागपूरसाठी २५५ रुपये तिकीट होते, आता २९२ रुपये मोजावे लागणार आहेत.
एसटी महामंडळाने लागू केलेली भाडेवाढ लागू झाली आहे. त्यामुळे प्रवाशांच्या खिशावर याचा भार पडणार आहे. एकीकडे एसटी महामंडळाने सवलतींचा वर्षाव केला आहे. ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास, महिलांना अर्धे तिकीट अशा परिस्थितीत भाडेवाढीचा सामान्य प्रवाशांना भुर्दंड सहन करावा लागणार आहे. मागील तीन वर्षांपासून एसटीच्या तिकीट वाढ झाली नव्हती. त्यामुळे एसटीचे चाक तोट्यात रुतले होते. यातून बाहेर काढण्यासाठी भाववाढ आवश्यक होती, असे एसटी महामंडळाने स्पष्ट केले आहे. तिकीट दरात वाढ करतानाच चांगली सेवाही द्यावी लागणार आहे. प्रवाशांकडून चांगल्या सुविधांची अपेक्षा राहील.
सुट्टया पैशांसाठी वाढणार डोकेदुखी भाडेवाढ विषम प्रमाणात झाल्याने आता ग्रामीण भागातील जनतेला तिकीट काढताना सुट्टया पैशांची अडचण येऊ शकते. नवीन भाडेवाढ करताना ती सम प्रमाणात न झाल्याने सुट्टे पैसे जर प्रवाशांकडे नसतील तर वाहक आणि प्रवाशांत वाद होऊ शकतात. पूर्वी भाडेवाढ करताना पाच रुपयांच्या पटीत केली जात होती. परंतु नवीन भाडेवाढ मात्र एक रुपयांच्या पटीत केली आहे. त्यामुळे प्रवाशांना तिकीट काढताना सुट्टे पैसे बाळगावे लागतील.
ठिकाणनिहाय तिकीट ठिकाण पूर्वीचे नवीन गडचिरोली- नागपूर २५५ २९२गडचिरोली- चंद्रपूर १२५ १४२गडचिरोली- चामोर्शी ५५ ६१गडचिरोली- अहेरी १७५ २०२गडचिरोली- देसाईगंज ८० ९० गडचिरोली- सावली ४५ ५१गडचिरोली- मूल ६० ७१गडचिरोली- धानोरा ५५ ६१