गडचिरोली : धानोरा तालुक्यातील चातगाव पोलीस मदत केंद्रांतर्गत येणाऱ्या होरेकसा येथील एका ग्रामस्थाची नक्षलवाद्यांनी शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास गोळी झाडून हत्या केली. पांडुरंग गांडोजी पदा (४६ वर्ष) असे मृताचे नाव आहे. मध्यरात्री १२ ते १२.३० वाजताच्या सुमारास काही सशस्त्र नक्षलवाद्यांनी गावात येऊन पदा यांचे घर गाठले. त्यांना घरून उठवून जंगलात नेले. कुटुंबीयांनी नेऊ नका, अशी विनंती केली पण त्यांच्या विनंतीला नक्षल्यांनी जुमानले नाही. जंगलात नेऊन पदा यांना जबर मारहाण करून छातीवर गोळी झाडण्यात आली आणि मृतदेह गावाजवळ आणून टाकला.पोलीस खब-या असल्याच्या संशयातून ही हत्या झाल्याचे समजते. अलीकडे घडलेल्या काही चकमकीत मोठ्या प्रमाणात नक्षलवादी मारले गेले. त्याचानिषेध म्हणून शुक्र वारी नक्षलवाद्यांनी भारत बंदचे आवाहन केले होते. त्याला जिल्ह्यात फारसा प्रतिसाद मिळाला नसला तरी नक्षलवादी आपले अस्तित्व दाखवून नागरिकांमधे दहशत पसरविण्याचा प्रयत्न करीत आहेत, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
नक्षल्यांनी गोळी झाडून केली एकाची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 05:49 IST