पोलिसांची माहिती : चळवळीला हादरा बसल्याचा दावागडचिरोली : धानोरा तालुक्यातील छत्तीसगड सीमेलगत कनगडी गावात अटक करण्यात आलेली महिला नक्षलवादी उपकमांडर अरूणा उर्फ पूनई देवसिंग नैताम हिच्यावर सहा लाखाचे बक्षीस होते, अशी माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे. २४ वर्षीय अरूणा ही जहाल नक्षलवादी असून ती टिपागड दलम प्लाटून १५ मध्ये कार्यरत होती. ती माड एरिया स्टॉफटीमध्ये सदस्य म्हणून कार्यरत होती. तसेच कंपनी क्रमांक १० मध्ये सेक्शन ए उपकमांडर म्हणून कार्यरत होती, अशी माहिती पोलीस प्रशासनाने दिली. जहाल नक्षलवादी अरूणा हिच्यावर भादविचे कलम ३०७, ३५३, १४३, १४७, १४८, १२० व भारतीय हत्यार कायद्याचे कलम ३/२५, भारतीय स्फोटक कायद्याचे कलम ४, ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अरूणा हिचा २०११ व २०१३ च्या नारगुंडा, २०१३ च्या मुरंगल, २०१४ मधील फुलकोडो, छोटा झेलिया, टेकामेट्टा आदी नक्षल कारवायांमध्ये सक्रीय सहभाग होता. सदर जहाल महिला नक्षलवादी महाराष्ट्र-छत्तीसगड सीमावर्ती भागामध्ये कार्यरत होती. महाराष्ट्र व छत्तीसगड राज्यामधील नक्षली गुन्ह्यांमध्ये तिचा सहभाग होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
जहाल नक्षलवादी अरूणावर होते सहा लाखांचे बक्षीस
By admin | Updated: January 23, 2015 02:21 IST