गडचिरोली : बलात्कार, बालकांवरील लैंगिक अत्याचार यामधील पीडित महिला व बालक यांना तातडीने आधार देण्यासाठी तसेच मानसिक आघातातून बाहेर पडण्यासाठी साहाय्य करण्याच्या हेतूने राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्यावतीने जिल्ह्यामध्ये मनोधैर्य टीम गठित करण्यात येणार आहे. बलात्कार, बालकांवरील लैंगिक अत्याचारामध्ये पीडित महिला व बालकांना अर्थसहाय्य व पुनर्वसनासाठी राज्यामध्ये २१ आॅक्टोबर २०१३ पासून मनोधैर्य ही योजना २ आॅक्टोबर २०१३ नंतर घडलेल्या घटनांसाठी अंमलात आली आहे. याअंतर्गत पीडित महिला व बालकांना तातडीने आधार मिळण्यासाठी त्यांना मानसिक आघातातून बाहेर काढण्यासाठी मनोधैर्य टीम गठित करण्यात येणार आहे. या टीममध्ये पोलीस ठाण्यातील अधिकारी, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारीतील जिल्हा व तालुका स्तरावरील जिल्हा सामान्य रूग्णालय, ग्रामीण रूग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, मानसोपचार तज्ज्ञ आणि परिचारिका, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्या अखत्यारीतील सर्व संरक्षण अधिकारी, बाल परीविक्षा अधिकारी, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांचा समावेश राहणार आहे. प्रत्येक पोलीस ठाण्यामधील किमान ५० पोलीस अधिकारी, आरोग्य विभागातील ५० टक्के वैद्यकीय अधिकारी, मानसोपचार तज्ज्ञ, परिचारिका त्याचप्रमाणे महिला व बालविकास विभागातील सर्व संरक्षण अधिकारी यांना पुणे येथील महिला व बालविकास आयुक्तालयाच्या सुविधा कक्षात सहकार्याने तज्ज्ञ साधन व्यक्तीमार्फत प्रशिक्षण दिले जाणार आहे. बलात्कार, बालकांवरील लैंगिक अत्याचाराची माहिती मिळाल्यानंतर मनोधैर्य टीमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांना संबंधित ठिकाणी पाठविण्याची जबाबदारी पोलीस अधीक्षक, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांची राहणर आहे. या संदर्भात महिला व बालविकास विभागाच्यावतीने २६ आॅगस्ट रोजी परिपत्रक निर्गमित करण्यात आले. शासनाच्या धोरणामुळे पीडित महिला व बालकांना तातडीने आधार मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
पीडितांना साहाय्य देण्यासाठी मनोधैर्य टीम गठित होणार
By admin | Updated: August 27, 2014 23:30 IST