दिवाळीनिमित्त दरदिवशी कोट्यवधीची उलाढाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2019 06:00 AM2019-10-27T06:00:00+5:302019-10-27T06:00:31+5:30

सर्वात मोठा सण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिवाळीसाठी नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात खरेदी केली जात आहे. या स्थायी दुकानांसह अनेक अस्थायी व्यावसायिकांची दुकानेही रस्त्याच्या कडेला सजली आहेत. विधानसभा निवडणुकीचे काम आटोपल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारी स्थानिक सुटी जाहीर केली.

Make a turnover of billions every day for Diwali | दिवाळीनिमित्त दरदिवशी कोट्यवधीची उलाढाल

दिवाळीनिमित्त दरदिवशी कोट्यवधीची उलाढाल

googlenewsNext
ठळक मुद्देयावर्षी गाठला उच्चांक । गडचिरोलीसह देसाईगंजमध्ये दोन दिवसात खरेदीसाठी झुंबड

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : दिवाळी सणानिमित्त गडचिरोली शहर व तालुकास्तरावरील बाजारपेठेत मागील दोन दिवसांपासून चांगलीच गर्दी उसळली आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून दररोज कोट्यवधींची उलाढाल होत आहे. यावर्षी खरेदीचा उच्चांक गाठण्याची शक्यता दुकानदारांनी व्यक्त केली आहे. कपडे, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंसह दोन दिवसांपासून सराफा बाजारही तेजीत आहे. मात्र सोन्याच्या दरात झालेल्या वाढीमुळे अपेक्षित व्यवसाय अजूनही झालेला नाही.
सर्वात मोठा सण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिवाळीसाठी नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात खरेदी केली जात आहे. या स्थायी दुकानांसह अनेक अस्थायी व्यावसायिकांची दुकानेही रस्त्याच्या कडेला सजली आहेत. विधानसभा निवडणुकीचे काम आटोपल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारी स्थानिक सुटी जाहीर केली. दुसऱ्या शनिवारनंतर सोमवार व मंगळवारची शासकीय सुटी असल्यामुळे कर्मचाऱ्यांना सहा दिवसांच्या सुट्यांचा आनंद घेता येत आहे. गुरूवारपर्यंत कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने बाजारात पाहीजे त्या प्रमाणात तेजी नव्हती. यावर्षी विक्री वाढणार की नाही अशी शंका दुकानदार व्यक्त करीत होते. मात्र शुक्रवारनंतर बाजारात ग्राहकांची गर्दी वाढली आहे.
यावर्षी पाऊस चांगला पडल्याने धानपीक चांगले आहे. त्यामुळे शेतकरी आनंदात आहे. परिणामी दोन पैसे अधिक खर्च करण्याची ऐपत शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. शासकीय कर्मचाऱ्यांचे आॅक्टोबर महिन्याचे वेतन झाले नसले मात्र अग्रीम रक्कम म्हणून १२ हजार ५०० रूपये दिले आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या हातात पैसा खेळायला लागला आहे. यातून विविध वस्तूंची खरेदी केली जात आहे.
खास करून कापड दुकाने, इलेक्ट्रॉनिक वस्तुची दुकाने, सोने-चांदीची दुकाने, मिठाईच्या दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी दिसून येत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत प्रत्येक वस्तुच्या भावात जवळपास १० ते १५ टक्के वाढ झाली आहे. याचा अनुभव ग्राहकांना दुकानात गेल्यानंतर येत आहे. त्यामुळे सोन्याच्या वस्तू खरेदीवर थोडा परिणाम असला तरीही इतर वस्तू खरेदी करताना ग्राहकांमध्ये उत्साह दिसून येत आहे. बाजारपेठेतील गर्दी मंगळवारपर्यंत कायम राहणार असून विक्रीचा नवीन उच्चांक गाठण्याची शक्यता दुकानदारांनी लोकमतकडे व्यक्त केली आहे.

देसाईगंजातील कापड दुकाने हाऊसफुल्ल
देसाईगंज शहरातील कापड बाजारपेठ संपूर्ण जिल्ह्यात प्रसिद्ध आहेत. जिल्ह्यातील ग्राहकांसह नजीकच्या भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील नागरिकही या ठिकाणी कपडे खरेदीसाठी येतात. मागील चार दिवसांपासून देसाईगंजातील कापड दुकाने ग्राहकांनी हाऊसफुल्ल आहेत. गडचिरोली शहर व तालुकास्तरावरील दुकांनामध्येही गर्दी दिसून येत आहे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून अनेक फॅन्सी ड्रेसेस दुकांनामध्ये उपलब्ध झाले आहेत. सदर ड्रेसेस ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी दुकानदारांनी १० ते २० टक्के सुट जाहीर केल्या आहेत.

अचानक आलेल्या पावसामुळे उडाली तारांबळ
शनिवारी दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास गडचिरोली शहरात दमदार पाऊस झाला. सकाळपासून वातावरण चांगले असल्याने बाजारपेठेत गर्दी झाली होती. मात्र अचानक आलेल्या पावसामुळे विक्रेते व ग्राहक यांची तारांबळ उडाली. बाजारपेठेत रांगोळी, लक्ष्मीच्या मूर्त्या व देवीदेवतांचे पोस्टर, दिवे विकण्यासाठी विक्रेते उघड्यावरच बसले होते. अचानक आलेल्या पावसामुळे या दुकानदारांची पंचाईत झाली. उद्या लक्ष्मीपूजन आहे. त्यामुळे पावसाने उसंत घ्यावी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.

सहकारी बँकेच्या एटीएमने दिला नागरिकांना दिलासा
गडचिरोली शहरात राष्ट्रीयकृत व सहकारी बँकांचे मिळून २५ पेक्षा अधिक एटीएम आहेत. मात्र राष्ट्रीयकृत बँकांच्या एटीएममध्ये शुक्रवारीच ठणठणाट होता. त्यामुळे ग्राहक सहकारी बँकेच्या एटीएममधून पैसे काढत होते. शुक्रवारी व शनिवारी सहकारी बँकांच्या एटीएममध्ये ग्राहकांची दिवसभर गर्दी उसळली होती. रोकडअभावी ग्राहकांची गैरसोय होऊ नये यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने एटीएममध्ये पैसे टाकण्यासाठी स्वतंत्र कर्मचाºयांची नियुक्ती केली आहे.

Web Title: Make a turnover of billions every day for Diwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Diwaliदिवाळी