वैरागड : विदर्भातील आठ जिल्ह्यात सिंचन विकास कार्यक्रम कृषी विभाग व लघु सिंचन विभागामार्फत सुरू करण्यात आला असून या योजनेत लघु सिंचन विभाग नदीवर कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे बांधले जाणार आहेत. सामूहिक उपसा सिंचन योजनेद्वारे शेतकऱ्यांना पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी संपन्न शेतीसाठी विदर्भसधन सिंचन विकास कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी वैभव तांबे यांनी केले.आरमोरी तालुक्यातील नवखेडा (पिसेवडधा) येथे विदर्भ सिंचन विकास कार्यक्रमांतर्गत पांडुरंग सिडाम यांच्या शेतातील शेततळ्याच्या खोदकाम शुभारंभप्रसंगीच्या कार्यशाळेत ते बोलत होते. कार्यक्रमादरम्यान सरपंच छाया मडावी, पं. स. सदस्य इंदिरा मोहुर्ले, तालुका कृषी अधिकारी लंकेश तांबे, पोलीस पाटील भाऊराव भोयर, काशिनाथ टेकाम, मुन्ना गुरनुले, दयाराम चंदेल, बाबुराव मडकाम, मंडळ कृषी अधिकारी भोयर उपस्थित होते. सदर प्रकल्पात शेतकऱ्यांना शेततळे खोदून दिले जाणार आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात जी क्रांती झाली त्या धर्तीवर शेतकऱ्यांना फळपिकांच्या उत्पादनासाठी प्रवृत्त केले जाणार आहे. कार्यक्रमाचे संचालन बी. जे. मसराम तर आभार सहारे यांनी मानले. कटरे, कोल्हे, कोहळे, क्षीरसागर, शंभरकर, ठाकरे, यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)
संपन्नतेसाठी सिंचन विकास कार्यक्रम यशस्वी करा
By admin | Updated: August 26, 2014 23:27 IST