लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर घातपाताचा डाव उधळला,  चार माओवाद्यांचा खात्मा 

By संजय तिपाले | Published: March 19, 2024 09:25 AM2024-03-19T09:25:29+5:302024-03-19T09:26:38+5:30

छत्तीसगड सीमेवर धुमश्चक्री : गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई.

lok sabha elections 2024 an assassination attempt was failed four maoists were killed | लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर घातपाताचा डाव उधळला,  चार माओवाद्यांचा खात्मा 

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर घातपाताचा डाव उधळला,  चार माओवाद्यांचा खात्मा 

संजय तिपाले, गडचिरोली : येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घातपात घडवून आणण्यासाठी तेलंगणातून गडचिरोलीत दाखल झालेल्या माओवादी व पोलिस जवानांत १९ मार्च रोजी पहाटे छत्तीसगड सीमेवर कोलामार्का जंगलात जोरदार चकमक उडाली. यात चार माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश आले. निवडणुकीच्या आधीच पोलिसांचा माओवादी चळवळीला हा मोठा धक्का मानला जात आहे.

माओवाद्यांच्या विभागीय समितीचा सदस्य वर्गेश, मांगी इंद्रावेल्ली क्षेत्र समितीचे सचिव कुमुराम भीम, मंचेरियल विभागीय समिती सदस्य मगटू, सिरपूर चेन्नूर क्षेत्र समितीचे सचिव कुरसंग राजू , सदस्य कुडिमेट्टा व्यंकटेश अशी माओवाद्यांची नावे आहेत. निवडणुकीच्या तोंडावर घातपात घडवून आणण्यासाठी माओवाद्यांच्या तेलंगणा राज्यातील समितीच्या काही सदस्यांनी तेलंगणातून प्राणहिता नदी ओलांडून गडचिरोलीत प्रवेश केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी नक्षलविरोधी अभियान गतिमान केले होते. अहेरी उपपोलिस मुख्यालयातील सी ६० आणि सीआरपीएफ क्यूएटीच्या पथकांनी अतिरिक्त पोलिस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शोध मोहीम राबवली.

रेपनपल्लीपासून ५ किमी  अंतरावर कोलामार्का जंगलात १९ मार्चरोजी पहाटे ४ वाजता पहाटे सी ६० जवानांच्या  एका पथकावर माओवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला, त्यालाजवानांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले. गोळीबार थांबल्यानंतर आणि परिसराची झडती घेतल्यानंतर चार माओवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. गोळीबाराच्या ठिकाणाहून १ एके ४७, १ कार्बाइन आणि २ देशी बनावटीचे पिस्तूल, नक्षलवादी साहित्य जप्त करण्यात आले आहे. 

३६ लाख रुपयांचे होते बक्षीस 

मृत चार माओवादी मोस्ट वाँटेड होते. त्यांच्यावर महाराष्ट्र सरकारने ३६ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. लोकसभा निवडणुकीच्या आधी गडचिरोली पोलिसांनी माओवादी चळवळीला मोठा हादरा दिला आहे.

या घटनेनंतर परिसरात नक्षलविरोधी अभियान गतिमान केले आहे. लोकसभा निवडणूक भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज आहे.
- नीलोत्पल, पोलिस अधीक्षक, गडचिरोली

Web Title: lok sabha elections 2024 an assassination attempt was failed four maoists were killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.