लाॅकडाऊनमुळे रस्ते अपघातात घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:38 AM2021-05-09T04:38:32+5:302021-05-09T04:38:32+5:30

कोरोनाचे संकट येण्यापूर्वी रस्ते अपघाताच्या प्रमाणात वाढ होऊन एकेका दिवशी अनेक लोकांचा जीव जात होता. तर ...

Lockdown reduces road accidents | लाॅकडाऊनमुळे रस्ते अपघातात घट

लाॅकडाऊनमुळे रस्ते अपघातात घट

Next

कोरोनाचे संकट येण्यापूर्वी रस्ते अपघाताच्या प्रमाणात वाढ होऊन एकेका दिवशी अनेक लोकांचा जीव जात होता. तर अनेक जण गंभीर जखमी होऊन हातपाय गमावून बसले. कित्येक जणांना रस्ता अपघातात अपंगत्व आले. दिवसेंदिवस खेड्यांपासून शहराच्या लोकसंख्येत भरमसाठ वाढ होत आहे. या वाढत्या लोकसंख्येनुसार लोकांच्या गरजाही वाढत असल्याने दुचाकी, चारचाकी व मोठ्या वाहनांची संख्या वाढली आहे. त्यामुळे दिवस-रात्र वाहनांची रस्त्याने सतत ये-जा सुरू राहायची. वाहतुकीसाठी रस्तेही अपुरे पडायला लागले होते. अरुंद रस्ते आणि ये-जा करणारे वाहन जास्त यामुळे दररोज अनेक रस्त्यांवर लहान-मोठ्या वाहनांना अपघात घडून यामध्ये अनेक जण गंभीर जखमी तर कित्येक जण मृत्युमुखी पडत होते.

मागील वर्षीपासून कोरोनाचे संकट आहे. त्याचा संसर्ग मोठ्या महानगरापासून तर खेड्यापाड्यांपर्यंत पोहाेचला. या महामारीपासून स्वतःला आणि कुटुंबाला वाचवण्यासाठी सर्वजण धडपड करीत आहेत. कोरोनाच्या संसर्गाला रोखण्यासाठी शासनाने लाॅकडाऊन व संचारबंदी केली. जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात पोलीस तैनात करण्यात येऊन सीमा लॉक करण्यात आल्या. शासन-प्रशासनाने जारी केलेल्या नियमांची कडक अंमलबजावणी सुरू झाल्यामुळे लोकांचे घराबाहेर निघणे, विनाकामाने वाहनाने फिरणे बंद झाले. नेहमीच वाहनांच्या कर्कश आवाजाने गजबजणारे रस्ते मोकळे झाले. त्यानंतर कोरोनाची पुन्हा दुसरी लाट आली आणि शासनाने पुन्हा दुसऱ्यांदा लाॅकडाऊन व संचारबंदी लागू केली. तसेच त्याची कठोर अंमलबजावणी सुरू करून ठिकठिकाणी पोलिसांद्वारे नाकाबंदी केल्यामुळे वाहन घेऊन घराबाहेर फिरणाऱ्यांना मोठा चाप बसला. त्यातच कोरोनाची भीती निर्माण झाल्याने व दुसरी लाट प्रभावी असल्याने लोकांचे रस्त्याने फिरणे बंद झाले. परिणामी रस्ते अपघाताचे प्रमाण घटले. कोरोनामुळे गेल्या वर्षभरात शासन-प्रशासनाने दोनदा संचारबंदी व लाॅकडाऊन केल्यामुळे गडचिरोली जिल्ह्यासह राज्यात रस्ते अपघातात मोठ्या प्रमाणात घट झाली असून शेकडो लोकांचा जीव वाचला.

बाॅक्स

पेट्रोल-डिझेल खर्चातही बचत

कोरोनामुळे संचारबंदी व लाॅकडाऊन आहे. अत्यावश्यक सेवा वगळता अनावश्यक वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले. त्यामुळे रस्त्यावर होणारी गर्दी कमी झाली. दुचाकी व चारचाकी वाहनाने विनाकारण फिरणे बंद झाल्याने अनेकांची वाहने घरीच पडून आहेत. आधीच पेट्रोल व डिझेलचे भाव गगनाला भिडले असल्याने दररोज पेट्रोल व डिझेलवर होणारा खर्च थांबला. परिणामी पैशांची अनावश्यक उधळपट्टी थांबून खर्चात मोठी बचत झाली.

Web Title: Lockdown reduces road accidents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.