झाडीपट्टी रंगभूमी निर्मात्यांना मदत करू

By Admin | Updated: August 18, 2016 01:44 IST2016-08-18T01:44:43+5:302016-08-18T01:44:43+5:30

झाडीपट्टी रंगभूमीतील निर्मात्यांनी महामंडळ स्थापन करावे, शासनस्तरावर त्यांना विविध प्रसंगी जी मदत शक्य आहे,

Let's help the shrimp theater makers | झाडीपट्टी रंगभूमी निर्मात्यांना मदत करू

झाडीपट्टी रंगभूमी निर्मात्यांना मदत करू

सुधीर मुनगंटीवार यांचे आश्वासन : रंगभूमी निर्मात्यांच्या शिष्टमंडळाने दिले निवेदन
देसाईगंज : झाडीपट्टी रंगभूमीतील निर्मात्यांनी महामंडळ स्थापन करावे, शासनस्तरावर त्यांना विविध प्रसंगी जी मदत शक्य आहे, ती आपण निश्चितपणे करू, असे आश्वासन राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.
देसाईगंज येथील विश्रामगृहावर मंगळवारी रंगभूमी निर्मात्यांच्या शिष्टमंडळाने ना. मुनगंटीवार यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी खा. अशोक नेते, जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक उपस्थित होते. तसेच झाडीपट्टी रंगभूमीतील कलावंत सुनील अष्टेकर, प्रल्हाद मेश्राम, यशवंत ढोरे, युवराज प्रधान आदी उपस्थित होते.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, साधारणत: ४५ ते ५० निर्माते गडचिरोलीसह चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात आहेत. दिवाळीपासून होळीपर्यंत चालणाऱ्या या झाडीपट्टीतील नाटकांना १५० वर्षांची परंपरा आहे. नाट्यकलावंत बॅकस्टेज याशिवाय अनेकांना या काळात रोजगार मिळतो. नाट्य रंगभूमीची उलाढाल १५० कोटी रूपयांच्या घरात असून यातून ४० लाखांचा करमणूक कर शासनास प्राप्त होत असतो. त्यामुळे लोकाश्रय प्राप्त असणाऱ्या या झाडीपट्टी रंगभूमीला राजाश्रय प्राप्त व्हावा, करमणूक कर माफ करावे, वृद्ध कलावंतांना मानधन वेळेवर देण्यात यावे, आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.
रंगभूमी महामंडळाची स्थापना झाल्यावर दरवर्षी महोत्सव घेण्यासाठी शासन निश्चितपणे आर्थिक मदत करेल, असे ना. मुनगंटीवार यांनी शिष्टमंडळास सांगितले. खा. अशोक नेते यांनीही झाडीपट्टी रंगभूमीला मदत करण्याची भूमिका असेल, असे यावेळी सांगितले. निवेदनावर यशवंत ढोरे, दिलीप वड्डे, संदेश आनंदे, अंबादास कामडी, युवराज प्रधान, अनिल उट्टलवार, प्रल्हाद मेश्राम, कमलाकर बोरकर, हिरालाल पेंटर, अनिरूद्ध वनकर, सदानंद बोरकर, संतोष कुमार, गौतम सिंहगडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Let's help the shrimp theater makers