निम्मेच प्रवेश : प्राथमिक वर्ग पडले ओसदिगांबर जवादे - गडचिरोलीगावोगावी निर्माण झालेल्या जिल्हा परिषदेच्या शाळा, मध्यान्ह भोजन योजना, आश्रमशाळांची दुर्दशा यामुळे पालकवर्ग आपल्या मुलाला आश्रमशाळेत टाकण्यास इच्छुक नाही. परिणामी आश्रमशाळांमध्ये निम्म्यापेक्षाही कमी प्रवेश झाले आहेत. गडचिरोली प्रकल्पातील २५ शासकीय आश्रमशाळांची १ ते १० या वर्गापर्यंची एकूण विद्यार्थी प्रवेश क्षमता १२ हजार ५०० एवढी असताना केवळ ६ हजार ३५९ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. १ ते ४ पर्यंतच्या वर्गांना तर विद्यार्थीच मिळणे कठीण झाले आहे. आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय व्हावी यासाठी आदिवासी विकास विभागाने आश्रमशाळांची निर्मिती केली. या आश्रमशाळांमध्ये शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या भोजनाची व राहण्याची सोय असल्याने आश्रमशाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या उड्या पडत होत्या. प्रत्येक आश्रमशाळेत प्रवेशाचा अर्ज भरल्या नंतर मेरीट लिस्ट लावण्यात येत होती व त्यानंतरच प्रवेश देण्यात येत होता. मात्र आश्रमशाळांचे हे दिवस आता मागे पडले आहेत. जिल्हा परिषदेच्या शिक्षकांप्रमाणेच आश्रमशाळेच्या शिक्षकांनाही विद्यार्थ्यांसाठी भटकंती करावी लागत आहे. शिक्षणापासून एकही बालक वंचित राहू नये, यासाठी शासनाने प्रत्येक गावामध्ये किमान १ ते ४ पर्यंतची शाळा उघडली आहेत. यामुळे कोसो दूर असलेल्या आश्रमशाळेत शिकण्याची गरज राहिली नाही. विद्यार्थ्याच्या भोजनाचीही व्यवस्था आश्रमशाळेत होत असल्याने पालकवर्ग आश्रमशाळांमध्ये प्रवेश घेत होते. मात्र शासनाने मध्यान्ह भोजन योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याला दुपारचे जेवन दिले जाते. त्यामुळे विद्यार्थ्याच्या भोजनाचाही प्रश्न मिटला आहे. १ ते ४ पर्यंतचे विद्यार्थी वयाने अत्यंत लहान राहत असल्याने स्वत:ची दिनचर्या करू शकत नाही. त्यामुळेही बहुतांश पालक आश्रमशाळेत आपल्या पाल्याला पाठविण्यास तयार होत नाही. गडचिरोली एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत एकूण २५ शासकीय आश्रमशाळा व १९ अनुदानित आश्रमशाळा चालविल्या जातात. अनुदानित आश्रमशाळेला विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार अनुदान मिळत असल्याने संस्था प्रमुख व शिक्षक विद्यार्थ्यांना वेगवेगळी प्रलोभने दाखवून विद्यार्थ्यांचे प्रवेश करून घेतात. त्यामुळे या आश्रमशाळांच्या विद्यार्थी प्रवेशाची स्थिती थोडी बरी असल्याचे दिसून येते. मात्र शासकीय आश्रमशाळांमध्ये प्रवेशाची स्थिती अत्यंत वाईट आहे. २५ शासकीय आश्रमशाळांची १ ते १० पर्यंत एकूण विद्यार्थी प्रवेशक्षमता १२ हजार ५०० विद्यार्थी एवढी आहे. त्यापैकी केवळ ६ हजार ३५९ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. यावरून ५० टक्के प्रवेश झालेत नसल्याचे स्पष्ट होते. १ ते ४ पर्यंतच्या वर्गांच्या प्रवेशाची स्थिती तर अत्यंत नाजुक आहे. १ ते ४ पर्यंतच्या वर्गांची प्रवेश क्षमता ५ हजार आहे. त्यापैकी केवळ १ हजार ३६१ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. म्हणजेच केवळ २७ टक्केच प्रवेश झाले आहेत. आश्रमशाळेच्या प्रत्येक वर्गामध्ये ४० निवासी व १० बहिस्थ असे एकूण ५० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. मात्र काही वर्गांमध्ये केवळ ४ ते ५ च विद्यार्थी शिल्लक आहेत. त्यांच्यासाठी शिक्षकांच्या वेतनाचा खर्च मात्र लाखोच्या घरात आहे. आश्रमशाळांकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरविण्यामागे आश्रमशाळांची झालेली दूर्दशा हेसुध्दा महत्त्वाचे कारण मानले जाते. प्रत्येक विद्यार्थ्याला उच्च दर्जाचे जेवन मिळावे एवढे पैसे शासनाकडून उपलब्ध करून देण्यात येत असले तरी प्रत्यक्षात मात्र आश्रमशाळेतील विद्यार्थ्याला पाणी भरलेले वरण व जे स्वस्त तेच खाऊ घातल्या जाते. प्रत्येक आश्रमशाळेला सोलर वाटर हिटर पुरविण्यात आले असले तरी सदर सोलर वाटर हिटर मागील अनेक दिवसांपासून बंद आहेत. आश्रमशाळांची अनेक दिवसांपासून डागडुजी करण्यात आलेली नाही. त्यामुळे पावसाळ्याच्या पाणी गळत असल्याने रात्र जागून काढावी लागते. खिडक्यांचे तावदान, दरवाजे तुटले असल्याने साप, विंचू, किडे चावून मृत्यूमुखी पडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही वाढत चालली आहे. अशा जोखीमभऱ्या परिस्थितीत पालक आपल्या पाल्याला आश्रमशाळेत ठेवण्यास तयार नसल्याने आश्रमशाळांचे प्रवेश शिल्लक राहिले असल्याचे दिसून येते.
आश्रमशाळांकडे पाठ
By admin | Updated: August 19, 2014 23:41 IST