देसाईगंज : केंद्र व राज्य सरकार कामगार विरोधी कायदे तयार करीत आहे. या कायद्याच्या अंमलबजावणीमुळे जिल्ह्यातील कामगारांवर अन्याय होत आहे, अशी टिका आयटकचे पदाधिकारी देवराव चवळे यांनी केली.आयटक व सीटू संलग्नीत कामगार संघटनेच्यावतीने देसाईगंज येथे कामगार मेळावा रविवारी घेण्यात आला. या मेळाव्यात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. येथील गजानन महाराज सभागृहात आयोजित कामगार मेळाव्याचे उद्घाट अखिल भारतीय आदिवासी महासभेचे राज्याध्यक्ष हिरालाल येरमे यांच्या हस्ते झाले. या मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून भाकपाचे जिल्हा सचिव डॉ. महेश कोपुलवार, जि. प. सदस्य अमोल मारकवार आदी उपस्थित होते. पुढे बोलतांना देवराव चवळे म्हणाले, २१ व्या शतकात खासगीकरण, उदारीकरण व जागतिकीकरणामुळे कामगारांच्या समस्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यावेळी त्यांनी कामगाराच्या लढ्याचा इतिहासही सांगितला. डॉ. महेश कोपुलवार म्हणाले, कामगार कपात आणि पेंशन योजना, कंत्राटी पद्धती व सरकारी नोकर भरतीकडे सरकारचे पूर्णत: दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे कामगारवर्गाने संघटीत राहून सरकारच्या विरोधात तीव्र लढा उभारावा, असेही आवाहन डॉ. कोपुलवार यांनी यावेळी केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक जि. प . सदस्य अमोल मारकवार, संचालन अॅड. जगदीश मेश्राम यांनी केले तर आभार कुसूम तितीरमारे यांनी मानले. मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी सुनिल पारधी, जलील खॉ पठाण, कांता फटिंग, कौशल्या गोंधोळे, शशीकला धात्रक, राधा ठाकरे, आशा चन्ने, मुक्ता लोणारकर, हरी नेवारे, सुखरू घरत, अमोल दामले, विलास तुपट, चंद्रभान मेश्राम, हरीपाल खोब्रागडे आदींनी सहकार्य केले. मेळाव्याला देसाईगंज तालुक्यातील कामगार महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या. (वार्ताहर)
सरकारचे कायदे कामगार विरोधी- चवळे
By admin | Updated: September 10, 2014 23:41 IST