गडचिरोली : गडचिरोली नगरपालिकेच्या हद्दीत येणाऱ्या गोकुलनगर लगत माता मंदिराच्या पलिकडे अनेक घरांची वस्ती गेल्या काही वर्षांपासून वसली आहे. अनेक कुटुंब या भागात वास्तव्यास आहेत. मात्र सदर भागात पक्के रस्ते, नाली, पथदिवे आदी मूलभूत सोयीसुविधांचा अभाव आहे.
तलाठी-ग्रामसेवकांच्या अनेक जागा रिक्त
एटापल्ली : अहेरी उपविभागाच्या एटापल्ली, भामरागड, सिरोंचा, मुलचेरा व अहेरी या पाचही तालुक्यात महसूल विभागांतर्गत येणाऱ्या तलाठी व ग्रामसेवकांची अनेक पदे रिक्त आहेत. परिणामी शेतकरी व नागरिकांची कामे खोळंबत असल्याचे दिसून येत आहे.
कुंपण अभावी पिकांचे जनावरांकडून नुकसान
गडचिरोली : प्राण्यांपासून शेतीचे संरक्षण करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने तार कुंपणाचा पुरवठा केला जातो. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना या तारांचा पुरवठा करण्याची मागणी आहे. शेत पिकांच्या संरक्षणासाठी सर्व प्रवर्गातील शेतकऱ्यांना काटेरी तार पुरविणे आवश्यक आहे. जनावरांच्या त्रासामुळे अनेकांनी शेती सोडली आहे.
एकेरी वाहतुकीबाबत हालचाली नाही
गडचिरोली : गडचिरोली शहरातील मुख्य बाजारपेठ त्रिमूर्ती चौकातून आठवडे बाजाराकडे जाणाऱ्या मार्गावर आहे. सणासुदीच्या कालावधीत व आठवडे बाजाराच्या दिवशी रविवारला या मार्गावर वाहनधारकांची प्रचंड गर्दी असते. अनेकदा वाहतुकीची कोंडी होते.
ठेंगण्या व अरूंद पुलाचा प्रश्न कायमच
गडचिरोली : ब्रिटिश काळात बांधलेला एकही पूल गडचिरोली जिल्ह्यात नसला तरी देशाच्या स्वातंत्र्यानंतर तयार करण्यात आलेला चंद्रपूर-आलापल्ली मार्गावरील आष्टीचा पूल ठेंगणा व अरूंद असल्यामुळे या पुलावरून आजवर अनेकांचा वाहन कोसळून बळी गेला आहे.
अंकिसा मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य
अंकिसा : सिरोंचा तालुक्यातील अंकिसा येथील मुख्य मार्गावर प्रचंड प्रमाणात खड्डे पडले आहेत. या मार्गावरून आसरअल्ली दरम्यानच्या गावातील नागरिक ये-जा करीत असल्याने या मार्गावरून वाहनांची नेहमीच वर्दळ राहते. त्यामुळे सदर मार्गाची बांधकाम विभागाने दुरूस्ती करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
साखरा बस थांब्यावर गतिरोधक उभारा
गडचिरोली : गडचिरोली-आरमोरी मार्गावर भरधाव वाहतूक होत असल्याने साखरा येथील बसथांब्यावर गतिरोधक निर्माण करावे, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. गतिरोधक अभावी या ठिकाणी अनेकदा अपघात घडले आहेत.
चामोर्शीतील तलावाचे सौंदर्यीकरण करा
चामोर्शी : शहरालगत असलेल्या तलावाचे सौंदर्यीकरण करण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत आहे. चामोर्शी शहरात फिरण्यासाठी व निवांत बसण्यासाठी प्रशस्त जागा नाही, त्यामुळे शहरातील तलावाचे सौंदर्यीकरण करावे, अशी मागणी शहरातील नागरिकांनी केली आहे.
मद्यपी वाहनचालकांवर कारवाई थंडबस्त्यात
गडचिरोली : तालुक्यात अनेक दुचाकी तसेच चारचाकी वाहनधारक दारू प्राशन करून वाहन चालवितात. याकडे वाहतूक तसेच उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाचे दुर्लक्ष होत आहे. तालुक्यात अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
वनहक्क पट्ट्यापासून नागरिक वंचित
कोरची : शासनाने वनहक्क अधिनियम २००६ अन्वये वन जमिनीचे पट्टे देण्याचे धोरण अंमलात आणले आहे. मात्र कागदपत्रांच्या अटीमुळे अद्यापही जिल्ह्यातील अनेक गरजू व गरीब नागरिक वन हक्काच्या पट्ट्यापासून वंचित असल्याचे दिसून येत आहे.
भेंडाळा बसस्थानकावर गतिरोधक उभारा
चामोर्शी : मूल-चामोर्शी मार्गावर असलेल्या भेंडाळा येथील बसस्थानकावर गतिरोधक उभारण्यात यावे, अशी मागणी नागरिक व प्रवाशांकडून केली जात आहे. चामोर्शी-मूल मार्गे तसेच आष्टीकडे जाणारी शेकडो वाहने भरधाव वेगाने जातात. गतिराेधक निर्माण केल्यास वेगाने धावणाऱ्या वाहनावर आळा बसण्यास साेयीस्कर हाेणार आहे.
पोटेगाव रस्त्यावर घाणीचे साम्राज्य
गडचिरोली : शहरातील पोटेगाव मार्ग निसर्गरम्य परिसर म्हणून ओळखला जातो. या मार्गाने अनेक नागरिक फेरफटका मारण्यासाठी पहाटे व सायंकाळी जात असतात. परंतु पोटेगाव रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी घाणीचे साम्राज्य आहे.
चामोर्शीत कुशल मजुरांचा तुटवडा
चामोर्शी : विविध कुशल कामे करताना बांधकाम करण्यासाठी कुशल मजुरांची आवश्यकता आहे. मात्र कुशल मजुरांची कमतरता आहे. तालुक्यातील अनेक गावांमध्ये दरवर्षी उन्हाळ्यात कुशल कामगारांचा तुटवडा जाणवतो. सध्या रेतीअभावी विविध प्रकारची बांधकामे ठप्प असली तरी फर्निचरसह विविध कामे सुरू आहेत. परंतु कुशल मजूर मिळणे कठीण झाले आहे.
सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतागृहे बांधा
आरमोरी : शहरात सार्वजनिक मूत्रिघर नसल्याने जनतेने स्वत:हून काही ठिकाणी अघोषित मूत्रिघर तयार केले आहेत. त्यामुळे जवळपासचे दुकानदार व घरमालक कमालीचे त्रस्त आहेत. सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतागृहे बांधणे आवश्यक आहे. अनेक दिवसांपासून ही मागणी केली जात आहे. परंतु या मागणीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते.
कुरूड परिसरात थ्री-जी सेवा नावापुरतीच
कुरूड : परिसरात बीएसएनएलच्या वतीने थ्री-जी सेवा देण्यात आली आहे. मात्र ही थ्री-जी सेवा केवळ नावापुरतीच असल्याचे दिसून येत आहे. या ठिकाणी बीएसएनएलची इंटरनेट स्पीड टू-जी सेवेप्रमाणे दिली जात आहे. नागरिकांकडून थ्री-जी सेवेचे पैसे घेतले जात असून सेवा मात्र टू-जी प्रमाणे दिली जात आहे. त्यामुळे ग्राहक त्रस्त आहेत.
शहरातील अनेक वार्डात सट्टापट्टी जोमात
देसाईगंज : शहरात सट्टापट्टी जोमात सुरू आहे. अनेक युवक सट्टापट्टीच्या नादात लागले आहेत. शहरात शेकडो एजंट सट्टापट्टीची वसुली करीत आहेत. मात्र याकडे देसाईगंज पोलिसांचे दुर्लक्ष झाले असल्याचे दिसून येते. सकाळपासूनच सट्टापट्टी लावण्यास सुरूवात होते.
तलाव सौंदर्यीकरणाचा प्रश्न थंडबस्त्यात
गडचिरोली : गोकुलनगर लगतच्या तलावाच्या सौंदर्यीकरणाचे काम काही वर्षांपूर्वी प्रशासनाच्या वतीने हाती घेण्यात आले होते. मात्र सौंदर्यीकरणाचे काम १०० टक्के पूर्ण झाले नाही. त्यामुळे या तलावात आता अतिक्रमण वाढले असून अस्वच्छता आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सदर तलाव सौंदर्यीकरणाचा प्रश्न थंडबस्त्यात आहे.
चामोर्शी मार्गावर शेड उभारण्याकडे दुर्लक्ष
गडचिरोली : राज्य परिवहन महामंडळाच्या गडचिरोली आगाराचा चामोर्शी मार्गावर थांबा देण्यात आला आहे. मात्र या ठिकाणी शेड नसल्याने प्रवाशी भर उन्हात बसची प्रतीक्षा करीत असतात. सदर बस थांब्यावरून अनेक प्रवाशी चामोर्शी, अहेरीकडे ये-जा करतात. त्यामुळे गडचिरोली आगाराने चामोर्शी मार्गावर प्रवाशांसाठी शेड उभारावा.
आशीर्वाद नगरात मोकाट डुकरांचा हैदोस
गडचिरोली : गोकुलनगर लगतच्या आशीर्वाद नगरात मोकाट डुकरांचा हैदोस वाढला आहे. रात्रीच्या सुमारास डुकराच्या आवाजामुळे नागरिकांना त्रास होत आहे. याशिवाय दुर्गंधी पसरल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अनेकदा नागरिकांची झोपमोड ही होते. त्यामुळे या डुकरांचा बंदोबस्त होणे आवश्यक आहे.
घर बांधकामाचा खर्च दुपटीने वाढला
गडचिरोली : गेल्या दोन वर्षांपासून लोहा, सिमेंट, रेती, विटा, गिट्टी व इतर बांधकाम साहित्याचे भाव प्रचंड वधारले आहे. याशिवाय मिस्त्री व मजुरीच्या दरातही वाढ झाली आहे. त्यामुळे पूर्वीच्या तुलनेत आता घर व इमारत बांधकामाचा खर्च दुपटीवर वाढला आहे. तीन वर्षांपूर्वी पाच लाखात होणाऱ्या घर बांधकामासाठी आता १२ लाखांहून जास्त खर्च लागत आहे. खर्च वाढल्याने घर बांधणारे अनेकजण कर्जात सापडले आहेत.
एटापल्ली तालुक्यातील सौरदिवे नादुरूस्तच
एटापल्ली : अतिदुर्गम भागात असलेल्या एटापल्ली तालुक्यातील आदिवासी गावात सौरदिवे लावण्यात आले. परंतु अनेक गावात लावण्यात आलेले सौरदिवे नादुरूस्त अवस्थेत आहेत. सौरदिव्यांच्या बॅटऱ्या चोरीला गेल्याने सौरदिवे निकामी झाले आहेत.
चामोर्शीतील तलाव सौंदर्यीकरणाच्या प्रतीक्षेत
चामोर्शी : शहरालगत असलेल्या तलावाचे सौंदर्यीकरण करण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत आहे. चामोर्शी शहरात फिरण्यासाठी व निवांत बसण्यासाठी प्रशस्त जागा नाही, त्यामुळे शहरातील तलावाचे सौंदर्यीकरण करावे, अशी मागणी प्रशासनाकडे अनेकदा करण्यात आली मात्र या मागणीकडे दुर्लक्ष झाले.
जननी सुरक्षा योजनेचा लाभ मिळण्यास दिरंगाई
आलापल्ली : गर्भवती व प्रसूत झालेल्या मातांना आर्थिकदृष्ट्या दिलासा देण्यासाठी शासनाच्या वतीने जननी शिशू सुरक्षा योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. मात्र जिल्ह्याच्या दुर्गम भागात कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत शस्त्रक्रिया केल्यानंतरही दोन ते अडीच महिने संबंधित मातांना लाभ मिळत नाही. प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर याबाबत प्रचंड दिरंगाई होत असल्याचे दिसून येत आहे.
ट्रॅक्टर चालकांसाठी परवाना शिबिराची गरज
एटापल्ली : तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर ट्रॅक्टरची संख्या वाढली आहे. वाहतूक विषयाचे कुठलेही ज्ञान व नियम अवगत नसलेले तरूण ट्रॅक्टर चालवितात. ट्रॅक्टर उलटून आजवर जिल्ह्यात पाच ते दहा नागरिकांचा मागील पाच वर्षांत मृत्यू झाला आहे. त्यामुळे ट्रॅक्टरधारक प्रशिक्षित असणे गरजेचे आहे. यासाठी शिबिर घेऊन परवाने द्यावे.
कचरा व्यवस्थापन प्रकल्प निर्माण करा
आरमोरी : शहरासह तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात कचरा व्यवस्थापनाचे काम रखडलेले आहे. त्यामुळे अनेक गावांच्या बाहेर कचऱ्याचे ढीग नेऊन टाकले जातात व या कचऱ्यावर दिवसभर जनावरे पसरून राहतात. त्यामुळे येथे कचरा व्यवस्थापन प्रकल्प निर्माण करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. यापूर्वी अनेकदा सदर मागणी करण्यात आली. परंतु या मागणीकडे दुर्लक्ष झाले.
कुरखेडा येथे पार्किंगची व्यवस्था करा
कुरखेडा : शहरातील मुख्य चौकात पार्किंगची व्यवस्था नाही. त्यामुळे नागरिक रस्त्यावरच वाहने ठेवतात. त्यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण होत असून अपघाताची शक्यताही वाढली आहे. पार्किंगची व्यवस्था नसल्याने दुकानात येणारे ग्राहक रस्त्यावरच वाहने उभी करतात. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होतो. त्यामुळे पार्किंगची व्यवस्था करावी.