मिलींद मेडपिलवार - तळोधी (मो.)केंद्र शासनाने भारत स्वच्छ मिशन (ग्रामीण) कार्यक्रमाची अंमलबजावणी देशभरात सुरू केली आहे. मात्र अशाही परिस्थितीत स्वच्छतेकडे ग्रा. पं. पदाधिकारी व प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. अशा नकारात्मक भूमिकेला तिलांजली देऊन चामोर्शी तालुक्यातील कुरूळ येथील सात सुशिक्षित युवकांनी १२ डिसेंबरपासून प्रत्यक्ष हातात झाडू घेऊन स्वच्छतेचा उपक्रम सुरू केला आहे. संपूर्ण गाव स्वच्छ केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा चंग या युवकांनी बांधला आहे.कुरूळ येथे १२ डिसेंबरपासून या युवकांच्यावतीने पहाटे ४ वाजतापासून सकाळी १० वाजेपर्यंत गावाची स्वच्छता केली जात आहे. गावातील एक -एक अंतर्गत रस्ता तसेच गावाबाहेरचे अस्वच्छ रस्ते स्वच्छ करण्याचे काम हे युवक करीत आहेत. संपूर्ण गाव स्वच्छ होईपर्यंत हा उपक्रम सुरूच राहणार असल्याचे या युवकांनी सांगितले. स्वच्छ व आदर्श गाव करण्यासाठी आम्हाला कोणत्याही ग्रा. पं. पदाधिकारी तसेच इतरांच्या मदतीची गरज नाही, असाही मनोदय त्यांनी व्यक्त केला आहे. शासनाचा उपक्रम म्हणून बहुतेक गावातील ग्रा. पं. पदाधिकारी केवळ १० ते १५ मिनिटासाठी हातात झाडू घेऊन स्वच्छतेचा कांगावा करतात. मात्र त्यानंतर स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाल्याने पुन्हा गावाला अस्वच्छतेचे मूळ स्वरूप प्राप्त होते. सात युवकांनी गेल्या दोन दिवसात बसथांब्यापासून गावात जाणारा रस्ता, बायपास रामपूर रस्ता झाडून स्वच्छ केला. तसेच खताच्या ढिगाऱ्याचीही गावाबाहेर दूर विल्हेवाट लावली. या स्वच्छतेच्या उपक्रमामध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेणारे नितीन शेंडे, प्रमोद चलाख आदींसह गीतेश बारसागडे, विनय मडावी, महेश सातपुते, दीपक नैताम, दीपक मडावी आदी सहभागी झाले आहे. सुशिक्षित युवकांनी स्वच्छतेचा विडा उचलल्यामुळे सदर उपक्रम गावकऱ्यांसाठी स्वच्छतेचा संदेश देणारा आहे. अशा प्रकारचा उपक्रम राबविणारे सुशिक्षित युवक प्रत्येक गावातून पुढे येण्याची गरज आहे.
कुरूळच्या युवकांनी धरला गाव स्वच्छतेचा ध्यास
By admin | Updated: December 13, 2014 22:39 IST