सर्वच पक्ष लागले कामाला : दोन्ही जिल्हा परिषद क्षेत्रात राहणार तगडे उमेदवार; पंचायत समितीकडेही लागले लक्षलिकेश अंबादे कोरचीतालुक्यात कोटरा-बिहिटेकला व बेडगाव-कोटगूल हे जिल्हा परिषद क्षेत्र आहेत. या दोन्ही क्षेत्रात काट्याच्या लढती होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. कोटरा-बिहिटेकला हा जिल्हा परिषद क्षेत्र अनुसूचित जमाती पुरूषासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. तर बेडगाव-कोटगूल क्षेत्र ओबीसी महिलेकरिता राखीव ठेवण्यात आला आहे. कोरची तालुक्यातील निवडणूक पहिल्या टप्प्यात १६ फेब्रुवारी रोजी होणार आहे. सद्य:स्थितीत बेडगाव-कोटगूल क्षेत्रातून पद्माकर मानकर हे जिल्हा परिषद सदस्य आहेत. तर कोटरा-बिहिटेकला क्षेत्रातून मागीलवेळी सुनंदा आतला या युवाशक्तीच्याच उमेदवार निवडून आल्या होत्या. गडचिरोली जिल्ह्यातील युवाशक्ती आता शिवसेनेमध्ये विलीन झाले आहे. त्यामुळे या दोन्ही जिल्हा परिषद क्षेत्रामधून शिवसेनेचेच उमेदवार उभे केले जाणार आहेत. कोरची तालुक्यातील गोंड समाजातील सर्व पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत ‘ग्रामसभा’ नावाचा पक्ष स्थापन केला आहे. या पक्षाने जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्वच जागांवर उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरची तालुक्यात गोंड समाजातील मतदारांची संख्या मोठ्या संख्येने आहे. त्यामुळे ग्रामसभा या पक्षाने शक्तीनिशी प्रचार केल्यास राष्ट्रीय पक्षांसमोरील अडचण वाढण्याची शक्यता आहे. २००७ मध्ये कोरची तालुक्यात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व होते. काँग्रेसच्या ज्योती भैसारे व राष्ट्रवादी काँग्रेसचे लक्ष्मण निकोडे हे उमेदवार जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले होते. कोरची पंचायत समितीतही एकूण चार उमेदवारांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन व काँग्रेसचा एक उमेदवार निवडून आला होता. या पंचायत समितीत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. मात्र २०१२ च्या निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसवर मात करीत युवाशक्तीने आपला जम बसविला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी जुना गड आपल्याकडे खेचून आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यातच विधानसभा व लोकसभा निवडणुकीदरम्यान भाजपासाठी अनुकूल वातारण तयार झाले. याचा फायदा उचलण्याची तयारी भाजपाने केली आहे. युवाशक्तीच्या माध्यमातून तयार झालेला गड आपल्याकडे कायम ठेवण्यासाठी शिवसेनेने प्रयत्न चालू केले आहेत. त्यामुळे काट्याची लढत होण्याची शक्यता आहे.
कोरची तालुक्यात होणार काट्याच्या लढती
By admin | Updated: January 28, 2017 01:23 IST