गडचिरोली : मतदार यादीत नाव आहे किंवा नाही याची खात्री करून घेण्यासाठी संबंधीत नागरिकांनी जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच १८००२२१९५० या टोल फ्री क्रमांकावर दूरध्वनी करून मतदार यादीतील नावाची माहिती करून घेण्याची सोय करण्यात आली आहे, अशी माहिती गडचिरोलीचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रणजितकुमार यांनी दिली आहे.लोकसभेच्या सार्वत्रीक निवडणुका २०१४ मध्ये झाल्यानंतर ९ जून ते ३० जून या कालावधीत छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुन:निरिक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. या कालावधीनंतर देखील निरंतर मतदार नोंदणी कार्यक्रम सुरू आहे. लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर एकूण २२ लाख नवीन मतदाराची नोंदणी करण्यात आली आहे. विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम लवकरच घोषीत होणार आहे. नवीन मतदार नोंदणीसाठी (नमुना ६) अर्ज विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम दिनांकाच्या १० दिवस आधीपर्यंत सादर करणे आवश्यक आहे. त्यामुळे मतदार नोंदणी करून घेण्यासाठी आता मर्यादीत कालावधी उपलब्ध आहे. नागरिकांनी महाराष्ट्र निवडणूक आयोगाच्या संकेत स्थळावरही भेट देऊन आपले नाव मतदार यादीत आहे किंवा नाही याची खात्री करून घ्यावी, यासाठीही व्यवस्था प्रशासनाने केली आहे, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. ज्या नागरिकांना येत्या विधानसभा निवडणुकीसाठी मतदान करण्याकरीता मतदार यादीमध्ये त्यांच्या नावाची नोंद करावयाची असेल त्यांनी संबंधीत मतदार नोंदणी अधिकारी कार्यालय किंवा मतदान मदत केंद्रामध्ये आवश्यक त्या सर्व कागदपत्र पुराव्यासह अर्ज सादर करावा, ज्या नागरिकांकडे जुने मतदार ओळखपत्र आहे परंतु त्यांचे नाव मतदार यादीमध्ये नाही किंवा वगळले गेले आहे. अशा नागरिकांनी जर त्यांच्या सामान्य रहिवासाचा पत्ता मतदार ओळखपत्राप्रमाणेच असल्यास जुन्या मतदार ओळखपत्राच्या छायाप्रतीसह नमूना ६ मध्ये अर्ज सादर करणे आवश्यक राहिल, असेही त्यांनी म्हटले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
मतदार यादीतील नावाबाबतची माहिती दूरध्वनीवरही मिळणार
By admin | Updated: September 11, 2014 23:31 IST