खासदारांच्या सूचना : जिल्ह्यातील दूरसंचार सेवेचा घेतला आढावागडचिरोली : बीएसएनएलने जिल्हाभरात शेकडो टॉवर उभारले आहेत. ही अत्यंत समाधानाची बाब असली तरी या टॉवरची क्षमता अत्यंत कमी आहे. त्यामुळे टॉवरच्या जवळही राहणाऱ्या मोबाईलधारकाला कव्हरेज मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. याकडे बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे, अशा सूचना खासदार अशोक नेते यांनी दिल्या. दूरसंचार विभागाच्या विश्रामगृहात आयोजित बैठकीत जिल्ह्यातील दूरसंचार सेवेचा आढावा २५ फेब्रुवारी रोजी खासदारांच्या हस्ते घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते. आढावा बैठकीला दूरसंचार सल्लागार समितीचे सदस्य तथा भाजपाचे प्रदेश सदस्य नाना नाकाडे, समिती सदस्य तथा कुरखेडा तालुकाध्यक्ष राम लांजेवार, अहेरीचे माजी तालुकाध्यक्ष विनोद आकनपल्लीवार, बीएसएनएलचे मुख्य अभियंता इलियाउद्दीन सय्यद, सहायक दूरसंचार अधिकारी कुलकर्णी, जे. एम. वाणीया, सोनकुसरे, बडोदे, गोनाडे, एस. पी. भोसले, अभियंता किशोर कापगते, गोपाल भांडेकर, प्रदीप हजारे, सुनील नंदनवार, आदी उपस्थित होते. बीएसएनएलने ज्या ठिकाणी टॉवर उभारले आहेत. त्या टॉवरची क्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न करावे, विद्युत पुरवठा खंडीत झाला तरी टॉवर काम करीत राहावे यासाठी बॅटरी, जनरेटर उपलब्ध करून द्यावे, बिघाड तत्काळ दुरूस्त करण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तींची नेमणूक करावी, तरंगसेवा बंद राहत असल्याने दुर्गम भागातील नागरिकांना सामना करावा लागत आहे. बीएसएनएल ही भारत सरकारची कंपनी आहे. त्यामुळे या कंपनीवर खासगी कंपन्यांच्या तुलनेत चांगली सेवा देत असल्याचा नागरिकांचा विश्वास आहे. या विश्वासाला तडा जाऊ देऊ नये, अशा सूचना दिल्या. (नगर प्रतिनिधी)
मोबाईल टॉवरची क्षमता वाढवा
By admin | Updated: February 27, 2016 01:37 IST