मकरंद अनासपुरे यांचे मत : गडचिरोलीत कौशल्य प्रशिक्षण प्रभावी राबविण्याची गरज कुरखेडा : आवश्यकतेपेक्षा अधिक संपत्ती असलेल्या नागरिकांनी सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून गोरगरीब, रंजलेल्या, कष्टकरी व शेतकऱ्यांच्या वेदना आणि दु:ख समजून घ्यावे, अशा गरजू नागरिकांच्या कल्याणासाठी योगदान दिले पाहिजे, समाजात दातृत्वाची भावना वाढीस लागणे गरजेचे आहे, असे मत प्रसिद्ध मराठी सिनेकलावंत तथा ‘नाम’ संस्थेचे संस्थापक मकरंद अनासपुरे यांनी व्यक्त केले. कुरखेडा येथे मंगळवारी रात्री नाट्यप्रयोगाच्या निमित्ताने ते आले होते. याप्रसंगी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. याप्रसंगी आ. क्रिष्णा गजबे, प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे, शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल उपस्थित होते. भविष्यात पर्यावरणाला होणाऱ्या हानीमुळे गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वेळीच समाजात याबाबत जागरूकता निर्माण होणे गरजेचे आहे. प्रशासकीय स्तरावरही याबाबत गांभीर्याने विचार होणे आवश्यक आहे, असे अनासपुरे यावेळी म्हणाले. गडचिरोली जिल्ह्यात उद्योगधंद्यांचा अभाव आहे. दुसरीकडे सुशिक्षित बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. परिणामी रिकाम्या हाताने असलेले अनेक युवक वाम मार्गाकडे वळण्याचा धोका निर्माण झाला आहे. यातून अराजकताही निर्माण होऊ शकते. शासनस्तरावरून या युवकांना दिशा दाखवत रोजगाराची संधी निर्माण झाली पाहिजे, यासाठी शासन व प्रशासकीय स्तरावरून कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम प्रभावी राबविण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे, असेही ते यावेळी म्हणाले. ‘नाम’ या सामाजिक संस्थेद्वारे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना स्वावलंबी करण्यासाठी आर्थिक मदत पुरविण्यात येते. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यांना उच्च शिक्षणाची सोय व्हावी म्हणून संस्थेच्या वतीने काही शाळा सुद्धा सुरू करण्यात आल्या आहेत, अशीही माहिती त्यांनी यावेळी दिली. यापुढे केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशपातळीवर ‘नाम’ या सामाजिक संस्थेद्वारे शहीद जवानांच्या कुटुंबीयांना मदतीच्या रूपात आधार देण्यात येईल, शहीद जवानांच्या पाल्यांकरिता शैक्षणिक मदत पुरविण्यात येईल, अशी माहिती मकरंद अनासपुरे यांनी दिली. (तालुका प्रतिनिधी)
समाजात दातृत्वाची भावना वाढीस लागावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2017 01:22 IST