लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : सध्या वातावरणात गारवा वाढला आहे. पारा घसरल्याने सर्दी, तापासह घसा खवखवणे हे आजार उद्भवू लागले आहेत. घसा बसणे हा एक सामान्य आणि सहसा दुर्लक्षित केला जाणारा त्रास आहे. हवामानात बदल झाला की, अनेकांना घसा बसण्याची समस्या जाणवते. काही जण डॉक्टरांचा सल्ला न घेता थेट दुकानातून औषधी खरेदी करतात. मात्र, हे अत्यंत चुकीचे असून मनानेच सिरप घेणे धोकादायक ठरू शकते. विशेषतः हिवाळ्यात प्रदूषण आणि थंड हवामानामुळे अनेकांना या त्रासाचा सामना करावा लागतो. घसा वारंवार कोरडा पडणे, जळजळ होणे आणि आवाज स्पष्ट न फुटणे अशी समस्या जाणवते.
पौष्टिक आहार खा अन् तंदुरुस्त राहाथंडीत पौष्टिक आहार हवा त्याचबरोबरच फलाहार, सुकामेवा हे उपयुक्त ठरेल. नियमित व्यायाम, मॉर्निंग वॉक निरोगी आरोग्यासाठी महत्त्वाचे आहेत. शीतपेय, शिळे पदार्थ, उघड्यावरचे खाणे टाळावे. या काळात शरीरातील जास्त ऊर्जा खर्च होत असल्याने भूक लागते. त्यामुळे या कालावधीत पौष्टिक आहार गरजेचा आहे.
जिवाणू, विषाणू, ॲलर्जीमुळे खोकलाधूर, धूलिकण, प्रदूषित हवा किंवा श्वसनमार्गातील जंतू फुप्फुसातून सोडलेल्या हवेच्या दाबाने खोकल्याद्वारे बाहेर टाकले जातात. आपल्या श्वासनलिकांत अडकलेले स्राव काढून टाकून श्वासनलिका मोकळ्या होतात. खोकल्याकडे दुर्लक्ष न करता वेळीच तपासणी गरजेची आहे.
असा करा घरगुती उपाय
- कोमट पाण्यात मध आणि लिंबू मिसळून प्यावे
- मधामध्ये अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असतात. हर्बल चहा, जसे की कॅमोमाइल किवा स्लिपरी एल्म टी पिणे.
- उबदार ग्रीन टी पिणे. हळदीचे दूध पिणे. हळदीमध्ये कर्क्युमिन असते, जे बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करते.
- कोमट मीठाच्या पाण्याने गुळण्या कराव्यात. हवेला आर्दता द्यावी.
- घशातील वेदना उपाय जसे की लोझेंजेस घ्याव्यात. थंड पाणी व पदार्थ हिवाळ्यामध्ये खाणे टाळावे.
- घसा, सर्दी, खोकला असा त्रास होऊ नये म्हणून गरम कपडे वापरावेत.
घसा खवखवतोय, अंगात कणकणव्हायरल इन्फेक्शन, जिवाणू संक्रमण यामुळे घशात खवखव व अंगात कणकण जावणते. यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते उपचार घेणे हितावह आहे. बहुतेक घसा खवखवणे २ ते ७ दिवसांत उपचारानंतर बरे होऊ शकते. त्यासाठी योग्य ती खबरदारी आवश्यक आहे.
"डॉक्टरांनाच माहित असते. मात्र मेडिकल चालकाला विचारून औषधी घेणे धोक्याचे ठरू शकते. मात्र अनेक नागरिक असे प्रयोग करतात. हे चुकीचे आहे. कायद्यान्वये गुन्हा आहे. तसेच आरोग्यासाठीसुद्धा धोकादायक आहे. प्रत्येकाने लक्षात ठेवण्याची गरज आहे. खोकल्याचे सिरपसुद्धा डॉक्टरांच्याच सल्ल्याने घ्यावे."- डॉ. प्रशांत कारेकर, फिजीशिअन, गडचिरोली