गिरड : लगतच्या खुर्सापार शेतशिवारात वाघाने चांगलाच धुमाकूळ घातला असून शेतकरी व शेतमजूर यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे शेती कशी करावी, असा प्रश्न निर्माण झाल्याने शेतकऱ्यांनी वनविभागाचे कार्यालय गाठून तीन तास ठिय्या आंदोलन केले. आमच्या जमिनीचे एकरी ३० लाख रुपये द्या, अन्यथा वाघाचा बंदोबस्त करा, अशी मागणी रेटण्यात आली. याकरिता वनविभागाला दोन दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला असून या मागणीचे उपवनसंरक्षक हरबिंदर सिंग यांना निवेदन देण्यात आले.
गिरड परिसरातील शेतकऱ्यांनी वनविभागाचे कार्यालय गाठून तीन तास ठिय्या आंदोलन केले. गेल्या चार ते पाच दिवसांपासून पाच ते सहा वाघ २४ तास लोकांना दिसत आहे. शेतकऱ्यांच्या बैलबंडीवर हल्ला करण्याचे प्रमाण वाढत आहे. दर दोन दिवसांनी जनावरांचा फडशा पाडत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याने शेतीसह पशुपालनालाही धोका निर्माण झाला आहे. वाघाच्या दहशतीने शेतीची कामे खोळंबली असून मजूरही शेतात कामाला यायला तयार नाही. त्यामुळे वनविभागाने शेतकऱ्यांना एकरी ३० लाख रुपये देऊन शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी आंदोलकांनी रेटून धरली. याची माहिती मिळताच उपवनसंरक्षक हरबिंदर सिंग, वनपरिक्षेत्र अधिकारी नीलेश गावंडे यांनी कार्यालय गाठले. यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्याची तारांबळ उडाली होती.
अधिकारी पोहोचले
यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी निवेदन देत या वाघांचा तातडीने बंदोबस्त करून भयमुक्त वातावरणात आम्हाला शेत करून द्या, सोबत शेतकऱ्याना एकरी तीस लाख रूपये द्या, अशी मागणी केली. उपवनसंरक्षक हरबिंदर सिंग, वनपरिक्षेत्र अधिकारी नीलेश गावंडे यांनी वाघांना पकडण्याचे आश्वासन दिले. यावेळी गिरड पोलिस ठाण्याचे ठाणेदार विकास गायकवाड यांनी आंदोलन स्थळी अनुचित घटना होऊ नाही यासाठी मोठा बंदोबस्त ठेवला होता.
अन्यथा आंदोलन तीव्र करणार
या वाघांचा तातडीने बंदोबस्त करावा, अन्यथा शेतकरी तीव्र आंदोलन करेल, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. यावेळी सरपंच राजू नौकरकर, उपसरपंच मंगेश गिरडे, माजी सरपंच विजय तडस, मोहगावचे सरपंच विलास नवघरे, ग्रामपंचायत सदस्य अमोल पर्बत, राहुल गाढवे, अरुण मोटघरे, प्रवीण चुटे, सुनील गाठे, बळवंत गाठे, विनोद येणुरकर, हमीद पटेल, नरेंद्र मिश्रा, नीलेश खाटीक, संदीप शिवणकर, सुभाष नन्नावरे, प्रवीण ठाकूर, प्रमोद गिरडे, प्रभाकर चामचोर यांच्यासह शेतकऱ्यांची उपस्थिती होती.