अहेरी : मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे स्थानिक वार्ड क्रमांक ४ मधील धरमपूर परिसरातील नागरिकांच्या घरात तलावाचे पाणी मोरीद्वारे शिरल्याने येथील नागरिकांच्या अनेक दैनंदिन गरजेच्या वस्तूंचे नुकसान झाले. पाण्याच्या प्रवाहामुळे या वार्डात असलेला रस्ता पूर्णत: उखडला आहे. मागील वर्षी या वार्डातील नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला होता. मात्र या समस्येचे निराकरण करण्याकडे स्थानिक प्रशासनाचे यंदाही पूर्णत: दुर्लक्ष होत आहे.स्थानिक धरमपूर वार्डाला लागूनच लहान तलाव आहे. भरपूर पाऊस झाल्याने यंदा हा तलाव ओव्हरफ्लो झाला आहे. या तलावातील पाणी कमी करण्याकरिता प्रशासनाच्यावतीने छोट्या कॅनलच्या ूमाध्यमातून पाणी बाहेर सोडले जात आहे. मात्र सध्य:स्थितीत तलावाचे पाणी बाहेर निघण्यासाठी कोणतेच कॅनल उपलब्ध नाही. परिणामी तलावाचे पाणी या परिसरातील नागरिकांच्या शेतात व घरात शिरत आहे. या पाण्याचा फटका नागरिकांना सहन करावा लागत आहे. पाण्यासह तलावातील कचरा, शेवाळ नागरिकांच्या घरात शिरत असल्याने रोगराई पसरण्याची शक्तता तसेच रोगांची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्य:स्थितीत प्रा. लाभसेटवार यांच्या घरासमोरून तलावाचे पाणी वाहत असल्याने या परिसरातील नागरिकांना पाण्याच्या दुर्गंधीचा त्रासही सहन करावा लागत आहे. मागील वर्षीही लाभसेटवार यांच्या घरासमोरून तलावाचे पाणी वाहत होते. परिणामी त्यांच्या घराची संरक्षक भिंत कोसळली होती. यंदा पाण्याचा निचरा पूर्ण होण्यासाठी जागाच उपलब्ध नसल्याने रस्त्यावरून पाणी वाहत आहे. पाण्याच्या प्रवाहामुळे वार्डातील रस्ता उखडला आहे. याच वार्डातील पठाण यांच्या घरात पाणी शिरल्याने पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे घरातील भांडी, कपडे व इतर साहित्य वाहून गेले. धरमपूर वार्डातील जवळपास ५० कुटुंबीयांनी आपले घर सोडून वेगळे बस्तान मांडलेले आहेत. मागील चार दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे या वार्डातील अनेक नागरिकांच्या वस्तूंची नासधूस झाली. या वार्डातील ग्रामपंचायत सदस्य शैलेश पटवर्धन यांनी सदर समस्येबाबत ग्रामपंचात प्रशासनाला सूचना दिल्या. परंतु तब्बल ४ दिवसानंतर ग्रामसेवक व तलाटी यांनी या वार्डाची पाहणी केली. त्यानंतर या वार्डाती कचरा व गाळ काढण्यात अ ाला. परंतु मागील अनेक वर्षांपासून या वार्डात मोठी नाली व स्लॅबड्रेन बांधण्यात यावे, अशी नागरिकांची मागणी असतांनाही ग्रामपंचायत प्रशासनाने वारंवार दुर्लक्ष केले आहे. दरवर्षी पावसाळ्या या वार्डातील नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो त्यामुळे या वार्डातील समस्या त्वरित सोडवाव्या, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. (प्रतिनिधी)
तलावाचे पाणी मोरीद्वारे घरात
By admin | Updated: September 13, 2014 01:36 IST