चामोर्शी मुख्य राष्ट्रीय महामार्गापासून हनुमाननगरकडे जाणारा बायपास रस्ता राईस मिलपासून ते घोट काॅर्नरपर्यंत दुरवस्थेत आहे. अनेक ठिकाणचे डांबर उखडून त्यातील गिट्टी व मुरुम निघून मोठे खड्डे पडले आहेत. या मार्गावर अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. दुचाकी, चारचाकी वाहनधारक, शेतीकडे जाणारे नागरिक, पादचारी यांना त्रास सहन करावा लागत आहे.
याच बायपास मार्गावर राईस मिल, पोस्ट ऑफिस, आश्रमशाळा, नर्सिंग कॉलेज, भूमिअभिलेख कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय, तलाठी व मंडल अधिकारी कार्यालय, सेतू केंद्र, दुकाने आहेत. तसेच कामानिमित्त जाणाऱ्या नागरिकांची चारचाकी, दुचाकी वाहनधारकांची प्रचंड वर्दळ असते. त्यामुळे या रस्त्याचे नव्याने बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी केली.
बॉक्स
वाहतूक कोंडी
चामोर्शी शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असून, एका बाजूला सिमेंट काँक्रिट रस्त्याचे बांधकाम करण्यात आले आहे. रस्ता उंच असल्याने सध्या खोदलेल्या मार्गाने वाहतूक सुरू आहे. त्यामुळे जिल्हा परिषद केंद्र शाळा व आष्टी काॅर्नरजवळ रोज वाहतुकीची कोंडी होताना दिसून येत आहे. वाहतूक काेंडीमुळे अपघाताची शक्यता आहे.