लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मिरची अथवा भाजीपाला पीक लागवडीसाठी मल्चिंग पेपर फायदेशीर ठरते. त्यामुळे अनेक शेतकरी भाजीपाला लागवडीसाठी मल्चिंग पेपरचा वापर करतात. जिल्ह्यातही अनेक शेतकरी मल्चिंग पेपरचा वापर करून अनुदानही मिळवत आहेत. शिवाय भरघोस उत्पादनही प्राप्त करत आहेत.
काळानुसार शेती पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल होत आहे. अत्याधुनिक पद्धतीचा वापर करून केवळ उत्पादनवाढीसाठीच नाही, तर त्यासाठी आवश्यक बाबींचाही विचार सरकारकडून केला जात आहे. ठिबक, स्प्रिंकलर हा त्यामधलाच एक भाग आहे. पण आता फळझाडे, भाजीपाला तसेच वेगवेगळ्या पिकांभोवती आच्छादन राहावे, जेणेकरून पाण्याच्या बाष्पीभवनामुळे होणारा ऱ्हास तर टाळता येतोच; शिवाय कीड-रोगराईपासूनही पिकाचे संरक्षण होते. अलीकडच्या काळात या प्लास्टिक मल्चिंग पेपरचा वापर वाढत आहे.
ही कागदपत्रे आवश्यकनोंदणीसाठी ७/१२, ८ अ, आधार कार्डची झेरॉक्स, आधार कार्ड हे बँकेशी संलग्न असल्याच्या पासबुकची झेरॉक्स असणे आवश्यक आहे.
प्लास्टिक मल्चिंगसाठी कसे आहे अनुदानप्लास्टिक मल्चिंगमुळे पिकांमध्ये तण वापले जात नाही. कीड-रोगराईचा प्रादुर्भावही होत नाही. सर्वसाधारण क्षेत्रासाठी प्रतिहेक्टर ३२ हजार रुपये खर्च येतो. खर्चाच्या ५० टक्के जास्तीत-जास्त रुपये म्हणजेच १७ हजार ४०० रुपये प्रतिहेक्टर याप्रमाणे २ हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत अनुदान दिले जाते.
असा करा पेपरचा वापर३ ते ४ महिने कालावधी असलेल्या पिकांसाठी २५ मायक्रॉन जाडीचे यू. व्ही. स्टॅबिलाइज्ड फिल्मचा पेपर गरजेचा आहे. मध्यम कालावधी म्हणजे ११ ते १२ महिन्यांच्या फळपिकांसाठी ५० मायक्रॉन जाडीचे यू. व्ही. स्टॅबिलाइज्ड फिल्मचा पेपर उपयोगी ठरणार आहे, अशी माहिती मिळाली.
"प्लास्टिक मल्चिंगमुळे पिकात तण वाढत नाही. पिकाला आवश्यक प्रमाणात खते व पाणीसुद्धा देता येते. त्यामुळे शेतकऱ्यांनी अनुदान योजनेतून प्लास्टिक मल्चिंगचा वापर करावा. जेणेकरून पिकांचे उत्पादन वाढण्यास मदत होईल."- किशोर भैसारे, कृषी सहायक
"मी प्लास्टिक मल्चिंगवर भाजीपाल्याची लागवड केली होती. अनुदानावर लाभ घेतला होता. आतासुद्धा मल्चिंगचा वापर करीत आहे. चांगला रिझल्ट येतो."- महेश टिकले, शेतकरी, खरपुंडी